नंदुरबार प्रतिनिधी। सरदार सरोवर प्रकल्पाची पाणी पातळी 138.68 मिटरवर झाल्याने महाराष्ट्रातील डूब क्षेत्रातील 33 गावांमधील बाधितांचे घर, शेती बुडीतात जात आहे परिणामी अनेकांना विस्थापित होण्याची वेळ आली असतांना प्रशासने ढिम्म भूमिका घेतली आहे. बुडीतांचे पंचनामे करून तातडीने जे प्रकल्प बाधितांची नावे तातडीने घोषित करावी या मागणीसाठी नर्मदा आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
सरदार सरोवर प्रकल्प यंदा पुर्ण क्षमतेने पाण्याने तुडुंब भरला आहे. त्यामुळे राज्यातील धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील 33 गावांमधील स्थिती विदारक झाली आहे. जे कुटूंब अद्यापही बुडित क्षेत्रात आहेत त्यांची स्थिती विदारक आहे. त्याकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नर्मदा बचाओ आंदोलना तर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांकशी झालेल्या चर्चेनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
नर्मदा जीवन शाळेला देखील पाण्याचा वेढा पडला आहे. विषारी सर्प, मगरी आणि इतर सरपटणारे प्राणी यांचा धोका विद्यार्थ्यांना आहे. प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता या आपत्तीला सामोरे जाव लागत आहे. त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात आला आहे. शिक्षणावरही त्यांचा परिणाम होत आहे. यावेळी जीवन शाळेतील विद्यार्थी देखील मोठय़ा संख्येन उपस्थित होते. त्यांनी आदिवासी भाषेत गाणी गात लक्ष वेधले.