उंदीर चावल्यामुळे ससून रुग्णालयातील रुग्णांचा मृत्यू; नातेवाईकांचे गंभीर आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये (Sassoon Hospital) एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या रुग्णालयात एका रुग्णाला उंदीर चावल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव सागर रेणुसे असून त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. परंतु आयसीयूमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर सागरला उंदीर चावला असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे. तसेच या कारणामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप देखील नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणामुळे ससून रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या 15 मार्च रोजी सागरचा दुचाकी चालवत असताना भीषण अपघात झाला होता. त्यामुळे त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या 25 तारखेला सागरवर रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली. पुढे त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. मात्र दिवसेंदिवस सागरची प्रकृती आणखीन ढासळत गेली आणि त्याचा मृत्यू झाला. यानंतर सागरच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या प्रशासनावर गंभीर आरोप लावले. तसेच सागरच्या मृत्यूला डॉक्टरांचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचे म्हटले.

मुख्य म्हणजे माध्यमांशी संवाद साधताना सागरच्या नातेवाईकांनी सांगितले की, सागरची प्रकृती खालावत असताना त्याची मामी त्याला रुग्णालयात भेटण्यासाठी गेली होती. यावेळी सागरने मामीला सांगितले की, मला रात्रभर खूप उंदीर चावले. उंदीर चावत असल्याचे मला जाणवत होते, परंतु मला कोणतीही शारीरिक हालचाल करता येत नसल्यामुळे मी काही करू शकलो नाही. मी डॉक्टरांना आवाज देण्याचा प्रयत्न केला परंतु माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही. ही सर्व माहिती मृत्यूपूर्वी सागरनेच आपल्या नातेवाईकांना दिल्यामुळे उंदीर चावल्यामुळे सागरचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी रुग्णालयावर लावला आहे.

दरम्यान, उंदीर चावल्यामुळे उद्भवणारे लेप्टोपायरसीस आणि इतर आजारामुळेच सागरचा मृत्यू झाला असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले आहे. या सर्व प्रकरणानंतर ससून रुग्णालया विरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणात लक्ष घालत पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.