Tuesday, January 7, 2025

Satara News : साताऱ्यात आज लाडकी बहीण योजनेचा सन्मान सोहळा; वाहतुकीत मोठा बदल, कोणते रस्ते बंद?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत करण्यात येत आहे. लाखो महिलांच्या बँक खात्यावर हे पैसे जमा झाले असून महिलावर्गात आनंदाचे वातावरण आहे. सरकारकडून या योजनेचा प्रचार- प्रसार करण्यासाठी ठिकठिकाणी लाडकी बहीण योजना सन्मान सोहळा घेण्यात येत आहे. आज हा सोहळा सातारा जिल्ह्यात (Satara District) आयोजित करण्यात आलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत आज दुपारी सैनिक स्कूलच्या मैदानावर लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांचा सन्मान सोहळा होणार आहे. यानिमित्ताने सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंत वाहतुक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे सातारकरांनी घराबाहेर पडताना वाहतुकीतील बदल जाणून घेणं गरजेचं आहे.

कोणकोणते रस्ते बंद?

१) बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते बांधकाम भवन जिल्हा परिषदेसमोरील रस्ता हा वाहतुकीस सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करणेत येत आहे.

२) गोडोली नाका, साईबाबा मंदिर मार्गे जिल्हा परिषद चौक येथे येणेस सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करणेत येत आहे.

३) कनिष्क मंगल कार्यालय बाजुकडुन जिल्हा परिषद चौक येथे येणेस सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करणेत येत आहे.

वाहतुकीकरीता पर्यायी मार्ग कोणते –

१) बॉम्बे रेस्टॉरंट बाजुकडुन सातारा शहरात येणारी वाहने ही अजंठा चौक, गोडोली नाका मार्गे पोवई नाका बाजुकडे येतील.

२) पोवई नाका बाजुकडुन बॉम्बे रेस्टॉरंट बाजुकडे जाणारी वाहने ही बांधकाम भवन येथुन आर.टी.ओ. कार्यालय, सैनिकनगर मार्गे बॉम्बे रेस्टॉरंट चौक बाजुकडे रवाना होतील.

पार्किंग ठिकाणे-

१) ठक्कर सिटी- कराड, पाटण बाजुकडुन कार्यक्रमासाठी येणारी सर्व वाहने ही ठक्कर सिटी येथील मोकळ्या जागेत पार्किंग होतील.

२) जुनी MIDC- कोरेगांव, रहिमतपुर, माण, खटाव बाजुकडुन येणारी सर्व वाहने ही जुनी MIDC मध्ये रस्त्याचे कडेला पार्किंग होतील.

३) शाहु स्टेडीअम – वाई, महाबळेश्वर बाजुकडुन येणारी सर्व वाहने ही शाहु स्टेडीअम येथे पार्किंग होतील. ४) जिल्हा परिषद ग्राऊंड- सातारा शहर व मेढा बाजुकडुन येणारी सर्व वाहने ही जिल्हा परिषद मैदान येथे पार्किंग होतील.

५) वाढे फाटा-खंडाळा, फलटण बाजुकडुन येणारी सर्व वाहने ही वाढे फाटा पासुन सर्व्हिस रोडला पार्किंग होतील. तरी या बदलाची सर्व नागरिकांनी नोंद घेवुन पोलीस दलास सहकार्य करावे.