सातारा | जिल्ह्यातील विजेच्या शेतीपंपाचे लोडशेडिंग तीन दिवस व तीन रात्री असते. कडाक्याच्या थंडीत लोडशेडिंगमुळे शेतकऱ्यांच्या समस्यांत वाढ झाली आहे. या व इतर विविध मागण्यांसाठी कोरेगाव विकास आघाडी व शेतकरी संघटनेतर्फे आज महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळाच्या सातारा शाखेत निवेदन देण्यात आले.
काय आहेत मागण्या?
१) कडाक्याच्या थंडीमुळे शेतकऱ्यांना प्रचंड शारीरिक त्रास होत आहे.
२) जंगली प्राण्यांपासून शेतकऱ्यांच्या जीवाला धोका आहे.
३) अंधारामुळे रात्रीचा पंप चालू बंद करताना शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरं जावं लागत आहे.
४) रात्री अपरात्री शेतीला पाणी देत असताना सर्व कुटुंबियांनाही त्रास होतो.
५) मागील काही दिवसांत रात्रीच्या अतिरिक्त ताणामुळे हृदयविकाराच्या झटक्याने अनेक शेतकरी मृत्यूमुखीही पडले आहेत.
६) एखाद्या भागातील ट्रान्सफॉर्मर जळाल्यास/नादुरुस्त झाल्यास त्याकडे तातडीने लक्ष दिलं जात नाही. २ ते ३ महिने तो तशाच अवस्थेत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यावर तातडीने उपाययोजना करावी.
७) मागणी केलेल्या विजपंपाचे नवीन प्रलंबित मीटर्स लवकर उपलब्ध करुन देणे.
जिल्ह्यातील शेतकरी आधीच हवामानाच्या समस्या, दुष्काळ, महागाई, किमान आधारभूत किंमतीच्या प्रश्नाने त्रस्त आहे. लोडशेडिंगचा त्रास कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना आठवड्यातील ७ दिवस सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत वीज उपलब्ध करुन देण्यात यावी या मागणीसाठी हे निवेदन देण्यात आले.
यावेळी कोरेगाव तालुका विकास आघाडीचे पुरुषोत्तम माने, शेतकरी संघटनेचे शंकर गोडसे, उत्तमराव माने, नाझीम इनामदार, सोमनाथ जगताप व इतर शेतकरी बांधव उपस्थित होते.