साताऱ्याच्या पालकमंत्र्यांना त्यांच्याच लाडक्या गावात प्रवेश बंदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन|मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांना घाम फोडणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी गावोगावी राजकीय नेत्यांना बंदी करण्यात येत आहे. आरक्षणाच्या लढाईत स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी देखील मागे राहिलेली नाही. कराड तालुक्यात सर्वाधिक स्वातंत्र्य सैनिक असणाऱ्या  तांबवे गावाने सर्वपक्षीय नेत्यांना प्रवेश बंदी केली आहे. बुधवारी रात्री तरुणांनी तांबवे गावात बॅनरही लावले आहेत.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावचे सुपुत्र मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी निकराची लढाई सुरू केली आहे. त्यांच्या आंदोलनामुळे राज्यातील महायुतीचे सरकार हडबडून गेले आहे. आरक्षणासाठी सरकारने ३० दिवसाची मुदत मागितली. त्यावर जरांगे-पाटील यांनी ३० ऐवजी ४० दिवसांची दिलेली मुदत संपल्यानंतर जरांगे-पाटलांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची लढाई आता तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. जरांगे-पाटील यांना समर्थन देण्यासाठी गावंच्या गावं सारसावत आहेत. सर्वपक्षीय नेत्यांना मराठा समाजाने प्रवेश बंदी करून एक प्रकारे इशारा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्ताधारी हबकले आहेत. 

सातारा जिल्ह्यात देखील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तरुणाई अग्रेसर झाली आहे अनेक गावांमध्ये नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तसे बॅनर देखील झळकल्याचे पाहायला मिळत आहे. स्वातंत्र्यसैनिकांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या तांबवे (ता. कराड) गावात बैठक घेऊन मनोज जरांगे-पाटील यांच्या लढ्याला पाठिंबा देण्यात आला. तसेच मराठा आरक्षण मिळेपर्यंत सर्वपक्षीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी केल्याचे बॅनर तरुणांनी पुढाकार घेऊन लावले आहेत. 

पालकमंत्री शंभूराज देसाईंना धक्का!

राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री असलेल्या शंभूराज देसाई यांच्या पाटण विधानसभा मतदार संघात तांबवे गाव आहे. मनोज जरांगे-पाटील यांना पालकमंत्र्यांच्याच मतदार संघात समर्थन वाढू लागल्याने पालकमंत्र्यांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे तांबवे हे पालकमंत्री देसाई यांचे लाडके गाव असल्याचे सांगितले जाते. गावात कार्यक्रम आल्यास मंत्री देसाई हजेरी लावतातच. आता त्यांच्या लाडक्या गावात सर्वच राजकीय पुढाऱ्यांना गाव बंदी घालण्यात आल्याने त्यांना प्रवेश दिला तर नवलच.