सातारा LCB पथकाची मोठी कारवाई : शेंद्रे येथे 67 लाखांचा गुटखा जप्त, एकास अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात वाढत असलेल्या अंमली पदार्थांच्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेकडून कारवाई केली जात आहे. या पार्श्वभूमीवर या पथकाने सातारा येथील शेंद्रे हद्दीत आज दुपारी धडक कारवाई करीत सुमारे 47 लाख 1 हजार 920 रुपये किमतीचा गुटखा व 20 लाख रुपये किमतीचा कंटेनर असा एकूण 67 लाख 1 हजार 920 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून एकास अटक केली आहे.

गुफारान शमीम खान (वय 36, रा. 144 आयशा बिल्डिंग, भोलेनाथ नगर, मुंब्रा ठाणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेला गुटखा विक्रेत्यांचेवर कारवाई करण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिलेल्या होत्या. त्यानुषंगाने पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार केले. तसेच त्यांना गुटखा विक्रेत्यांचेवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.

त्यानुसार काल दि. 01 ऑक्टोबर रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना माहिती प्राप्त झाली की, एक इसम टाटा 1109 ट्रक कंटेनर मधून महाराष्ट्र राज्यामध्ये विक्री / वाहतूक करीता प्रतिबंधीत असलेला गुटखा पुणे येथे घेवून जाणार आहे. त्याप्रमाणे त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकास नमुद वाहन ताब्यात घेवून पुढील कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे नमुद पथकाने शेंद्रे ता.जि. सातारा गावचे हद्दीत समराथल राजस्थानी हायवे हॉटेलच्या जवळ सापळा लावला. 12.20 वाजण्याच्या सुमारास प्राप्त माहितीमधील टाटा 1109 ट्रक कंटेनर आल्याने त्यास थांबवून त्यामधील चालकाकडे विचारपूस केली.

त्यातील चालकाने कंटेनरमध्ये विमलख रजनीगंधा गुटखा असल्याचे सांगितले. विमल पान मसाला व तंबाखू, रजनीगंधा फ्लेवर्ड पानमसाला, तुलसी रॉयल जाफराणी जर्दा असा 47 लाख 1 हजार 920 रुपये किमतीचा प्रतिबंधीत गुटखा व २० लाख रुपये किमतीचा ट्रक कंटेनर असा एकूण ६७ लाख १ हजार ९२० रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती वंदना रुपनवर, इम्रान हवालदार यांना कळविल्यानंतर त्यांनी समक्ष हजर होवून ताब्यात घेतलेला मुद्देमाल जप्त केला. त्याबाबत सातारा तालूका पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद केला आहे.

पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक पंतग पाटील, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, मदन फाळके, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लैलेश फडतरे, मंगेश महाडीक, लक्ष्मण जगधने, सचिन साळुंखे, प्रविण फडतरे, सनी आवटे, अरुण पाटील, अविनाश चव्हाण, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, गणेश कापरे, स्वप्नील कुंभार, अमित माने, ओंकार यादव, विक्रम पिसाळ, मोहन पवार, पृथ्वीराज जाधव, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे यांनी सदरची कारवाई केली. कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी अभिनंदन केले आहे.