Satara News : माहिती मिळताच पोलिसांनी लावला सापळा अन् 10 लाखांसह अडकले 4 घरफोडीचे आरोपी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
माण तालुक्यात जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून नुकतीच एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी सापळा रचून घरफोडीतील चार आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 4 घरफोडी व 2 चोरीचे गुन्हे उघड केले आहे. तसेच सुमारे 10 लाख 45 हजार 250 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अमर बापूसाहेब देवगुडे (वय 26, रा. खोकडवाडी ता.जि. सातारा, संतोष शामराव
सोनटक्के (वय 25, रा. भांडवली ता.माण जि. सातारा, विनोद निवृत्ती खरात (वय 25, रा. श्रीनगर नवीन एमआयडीसी सातारा मुळ रा. भालवडी, ता. माण जि. सातारा) शशांक दिपक जाधव (वय 21, रा. खोकडवाडी ता. जि. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. 25 मार्च रोजी पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील व स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार दहीवडी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत होते. यावेळी त्यांना दहिवडी बाजूकडून सातारा बाजूकडे अशोक लेलंन्ट टेम्पो (क्रमांक MH 11 DD 2334) व मारुती अल्टो कार (क्रमांक MH 4 DJ 4115) मधून चोरीचा माल घेवून काही इसम येत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अमित पाटील व पोलीस अंमलदारांनी पिंगळी फाटा, ता. माण येथे सापळा लावला. आरोपींची गाडी येताच त्यांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेटलेल्या संबंधित घरफोडी करणाऱ्या आरोपींकडून जनरेटर, फ्रिज, संगणक, प्रिंटर, सोफासेट, गॅस शेगडी, पितळी मुर्त्या, एलसीडी टीव्ही, पिठाची चक्की, सिलेंडर, उसाचे गुराळ, मोपेड मोटार सायकल, टेम्पो व अल्टो कार असा एकूण 10 लाख 45 हजार 250 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. अटक केलेल्या आरोपींवर रहिमतपूर, औंध, दहिवडी, सातारा तालुका, पुसेगांव, चिपळून पोलीस ठाणे अशा ठिकाणी एकूण 4 घरफोडीचे व 2 चोरीचे गुन्हे दाखल होते. त्या गुन्ह्यांचाही यावेळी पोलिसांनी उलघडा केला आहे.

घरफोडीसंदर्भात करण्यात आलेली सदर कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे व पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांच्या अधिपत्त्याखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकातील विश्वास शिंगाडे, पोलीस अंमलदार उत्तम दबड़े, अतिश घाडगे, संतोष पवार, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, निलेश काटकर, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, गणेश कापरे, मोहन पवार, प्रविण कांबळे, विक्रम पिसाळ, रोहित निकम, सचिन ससाणे, पृथ्वीराज जाधव, मयुर देशमुख, शिवाजी गुरव यांनी कारवाई केली आहे. या कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी अभिनंदन केले आहे.