Satara Lok Sabha 2024 : शरद पवारांचा साताऱ्यासाठी हुकमी एक्का तोच चेहरा नवा?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘मी व्यथांची वेधकाळा, मी नभीचा मेघकाळा…. वाळवंटा ऐक माझे, मीच उद्याचा पावसाळा’ … गोष्ट आहे 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची…आघाडी आणि युती आपल्या आमदारकीचा आकडा वाढण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढत असताना या सगळ्यात पश्चिम महाराष्ट्रातल्या साखरपट्ट्यातील सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचं बिगुल वाजलं होतं…सहाच महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीच्या तिकिटावर सलग तिसऱ्यांदा निवडून आलेल्या उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला.. आणि भाजप पक्षाकडून तिकीटही मिळवली… लोकं राष्ट्रवादीकडे बघून नाही तर उदयनराजेंकडे बघून मतदान करतात या आत्मविश्वासावर त्यांनी राष्ट्रवादीचा हक्काचा बालेकिल्ला असलेल्या साताऱ्यात शरद पवारांना खुलं चॅलेंज दिलं. यावेळेस राष्ट्रवादीचा उमेदवार कोण? असा पेच असताना शरद पवारांचा एकनिष्ठ आणि जिगरी यार श्रीनिवास पाटील त्यांच्या मदतीला धावून आले.

सांगली आणि सातारा या दोन्ही मतदारसंघातून खासदारकीचा अनुभव असलेल्या श्रीनिवास पाटलांनी (Shriniwas Patil) राष्ट्रवादीकडून उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांच्या विरोधात दंड थोपटले…अत्यंत अटीतटीच्या बनलेल्या या निवडणुकीत उदयनराजेंची प्रतिष्ठा आणि पवारांचं राजकारण पणाला लागलं होतं…या पोटनिवडणुकीसाठी प्रचार सुरू झाला…श्रीनिवास पाटलांच्या एका सभेला शरद पवारही हजर होते…आभाळ दाटून आलं होतं…कधी पाऊस पडेल अशी चिन्हं होती…अखेर पवार भाषण करण्यासाठी पोडियम जवळ आले आणि जोराचा पाऊस सुरू झाला… या भर पावसातही अजिबात न डगमगता पवारांनी ऐतिहासिक भाषण केलं…ज्या भाषणाची महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात चर्चा झाली…आणि अखेर निकाल लागला…उदयनराजेंचं कॉलरचं पॉलिटिक्स पवारांच्या झंझावाती भाषणासमोर टिकलं नाही…आणि सहाच महिन्यांपूर्वी खासदार असलेल्या उदयनराजेंच्या एका निर्णयानं त्यांच्या पॉलिटिकल इमेजला मोठा धक्का बसला. आता २०२४ ला साताऱ्याच वारं कोणाच्या बाजूने वाहणार? भाजप, शिवसेना, अजित पवार गट यांच्यात जागावाटप करताना कोण बाजी मारणार? याबाबत आज आपण सविस्तर जाणून घेऊयात…

1999 मध्ये राष्ट्रवादी स्थापन झाल्यानंतर पवारांच्या पाठीशी बारामती नंतर जर कुठला हक्काचा लोकसभा मतदारसंघ राहिला असेल तर तो म्हणजे सातारा. १९९९ पासून साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार निवडून आला आहे. १९९९ आणि २००४ साली श्रीनिवास पाटील.. त्यानंतर २००९ आणि २०१४ साली उदयनराजे भोसले राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले. परंतु शरद पवारांचा खरा कस लागला तो म्हणजे २०१९ च्या लोकसभा पोटनिवडणुकीवेळी…. ज्या उदयनराजे भोसले याना २०१९ च्या निवडणुकीत शरद पवारांनी तिकीट देऊन खासदार केलं तेच उदयनराजे अवघ्या ६ महिन्यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये गेले आणि साताऱ्यात लोकसभेची पोटनिवडणूक लागली. उदयनराजेंनी शरद पवारांना दिलेलं हे खुलं आव्हान होतं. अर्थातच भाजपने हा मोठा मास्टर स्ट्रोक खेळला होता. भाजपकडून उदयनराजेंना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी घोषित करण्यात आली. अशा वेळेस राष्ट्रवादीकडून एनवेळी कुणाला तिकीट द्यायचं हा मोठा पेच होता. अशावेळेस शरद पवारांच्या मदतीला म्हणजेच एका सह्याद्रीच्या मदतीला दुसरा सह्याद्री धावून आला..

शरद पवारांचे महाविद्यालयीन जीवनापासूनचे जिवलग मित्र, माजी सनदी अधिकारी, सिक्कीमचे राज्यपाल आणि खासदारकीचा अनुभव असलेले श्रीनिवास पाटील यांनी पवारांच्या मैत्रीखातर निवडणूक लढवली. महाराष्ट्राच्या या हायव्होल्टेज ड्रामामध्ये उदयनराजे यांचा पराभव करत राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील खासदार झाले…आणि साताऱ्यात उदयनराजेंच्या चेहऱ्यापेक्षा राष्ट्रवादीचा शब्द चालतो हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं… यानंतर उदयनराजेंना भाजपकडून राज्यसभेची खासदारकी मिळाली तो भाग वेगळा! पण राष्ट्रवादीची आणि सातारकरांच्या प्रेमाची नाळ यामुळे आणखी गडद झाली…

साताऱ्यात कस आहे पक्षीय बलाबल –

सातारा मतदारसंघातील पक्षीय बलाबलाचा विचार केला तर या मतदारसंघात जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. यातल्या वाई मतदार संघात राष्ट्रवादीचे मकरंद पाटील आमदार असून सध्या ते अजितदादांसोबत आहेत. कोरेगाव मध्ये शिंदे यांच्या शिवसेनेचे महेश शिंदे आमदार आहेत. कराड उत्तर मधून शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील निवडून जातायत. कराड दक्षिणध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांचे निर्विवाद वर्चस्व राहिलय. तर पाटणमधून शंभूराजे देसाई शिंदे गटासोबत आहेत आणि सातारा मतदारसंघातील आधी राष्ट्रवादीचे कट्टर नेते समजले जाणारे शिवेंद्रराजे भोसले भाजपमधून आमदार झालेत. म्हणजेच दोन विधानसभा मतदारसंघ वगळले तर चार मतदारसंघावर महायुतीचा पगडा जास्त दिसतोय. असं असलं तरी मतदारसंघात शरद पवारांचा स्वतःचा असा एक फॅन बेस आहे. राष्ट्रवादीचं ग्राउंड नेटवर्क मजबूत आहे. त्यात शिवसेनेचे दोन आमदार दिसत असले तरी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांची मतं शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या पाठीशीच असल्याने यंदा या जागेवर चांगलीच गरमागरमी पाहायला मिळणारय.

श्रीनिवास पाटील 80 पार जाणार असल्यानं शरद पवार गटाकडून ते निवडणूक लढतील का? हा मोठा प्रश्न आहे. दुसरीकडे पोटनिवडणुकीत भाजपला सुटलेली ही जागा तशी पाहायला गेलं तर युतीच्या काळात शिवसेनेची राहिलीय. यंदाही साताऱ्याची जागा आपल्याकडेच राहावी यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तयारी केलीय. शिवसेनेच्या पुरुषोत्तम जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन लोकसभेच्या जागेसाठी फिल्डिंग लावलीय. इकडे भाजपच्या अंतर्गत गोटात उदयनराजेंऐवजी भाजपने दुसरा उमेदवार शोधावा अशीही चर्चा आहे. यात भरीतभर म्हणून सातारा लोकसभा हा अजित पवार गटालाच सुटणार अशा चर्चांनाही वेग आलाय. एकाबाजूला महायुतीत एकाचवेळी भाजप, शिवसेना आणि अजित पवार गट असे तिघेही सातारा लोकसभेवर दावा करत असताना महाविकास आघाडीने मात्र बऱ्यापैकी आपली गणितं बांधून घेतली आहेत.

श्रीनिवास पाटील जर निवडणूक लढवण्यास इच्छुक नसतील तर आयटी इंजिनिअर आणि शांत, सय्यमी, अभ्यासू अशा सारंग पाटील (Sarang Patil) यांना उमेदवारी देऊन शरद पवार मोठा डाव टाकण्याची शक्यता आहे. सातारा लोकसभेचा इतिहास पाहिला तर आजवर इथे सुसंस्कृत, उच्चशिक्षित, अभ्यासू व्यक्तिमत्वालाच सातारकर मतदारांनी साथ दिली आहे. खासदार श्रीनिवास पाटील यांनी २०१९ ची पोटनिवडणूक जिंकताच लोकसेवा नावाने कार्यालय सुरु करून झटपट लोकांची काम मार्गी लावण्याचा सपाटा लावला. यासर्व प्रक्रियेत सारंग पाटील यांनी अतिशय महत्वाची भूमिका घेत गावोगावी फिरून आपलं नेटवर्क भक्कम केलं. शिवाय सनबीम संस्थेच्या माध्यमातून सारंग पाटील यांचं आयटी क्षेत्राचं काम पाहता जिल्ह्यातील तरुणांना सारंग पाटील एक आश्वासक चेहरा वाटतो आहे. थिल्लर राजकारणाला कंटाळलेली जनता एक शांत, संयमी, अभ्यासू व्यक्तिमत्व शोधत असताना शरद पवार हुकमी एक्का तोच पण चेहरा नवा असं म्हणत श्रीनिवास पाटील हाच एक्का कायम ठेवत तरुण चेहऱ्यावर शिकामोर्तब करतील अशी शक्यता आहे.

सारंग पाटील यांच्याव्यतिरिक्त माजी मुख्यामंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि शशिकांत शिंदे यांचीही नावे मागील काही दिवसांत चर्चेत होती. परंतु अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर काँग्रेसची राज्यातील अतिशय महत्वाची जबाबदारी असताना ते खासदारकीला उभं राहण्याचा विचार करतील असं अजिबात वाटत नाही. तर शशिकांत शिंदे यांना कोरेगाव विधानसभा सांभाळणे राजकीय भविष्यासाठी अत्यावश्यक असल्यानं तेसुद्धा लोकसभा लढण्यास इच्छुक नसल्याचं समजत आहे. यानंतर सुनील माने आणि सत्यजित पाटणकर यांच्या नावांची कुजबुजही ऐकू येत असली तरी शरद पवार यंदाच्या लोकसभेत अजिबात रिस्क घेण्याच्या मूडमध्ये नसल्यानं एकतर श्रीनिवास पाटील किंवा सारंग पाटील यांनाच उमेदवारी जाहीर करतील असं जवळपास फिक्स आहे.