आगवणे पती- पत्नीसह 7 जणांवर मोक्का : जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
फलटण तालुक्यातील दिगंबर आगवणे व त्याच्या पत्नीसह त्यांच्या टोळीतील सातजणांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. पावणे तीन कोटींच्या फसवणुकीप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मोक्का प्रस्तावास मंजुरी दिली आहे. या मोक्का कारवाईमुळे राजकीय क्षेत्रात व फलटण तालुक्यात जिल्ह्यात खळबळ उडाली.

टोळीप्रमुख दिगंबर रोहिदास आगवणे व त्याची पत्नी जयश्री दिगंबर आगवणे (रा. गिरवी, ता. फलटण), स्नेहल रविंद्र बनसोडे (रा. गिरवी), आदिनाथ काशीनाथ मोटे (रा. सरडे, ता. फलटण), नितीन कालीदास करे (रा. वाठारस्टेशन, ता. कोरेगाव), सागर गायकवाड (रा. आसू ता. फलटण), अनिल रामचंद्र सरक (रा. नांदल, ता. फलटण) अशा सातजणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये कारवाई करत विशेष पोलस महानिरीक्षकांनी त्यांच्यावर मोक्का कारवाईस मंजुरी दिली आहे. दिगंबर आगवणे याने रणजित संदीप धुमाळ (रा. खुंटे, ता. फलटण) यांची दिशाभूल करत तसेच त्यांना आगवणेच्या मालकीच्या जे. डी. केमिकल्स अँड फर्टिलायझर कंपनीचे संचालक केले. त्यानंतर खोटी कागदपत्रे तयार करून धुमाळ यांच्या नावावर कंपनीच्या नावे 2 कोटी 75 लाख रुपयांचे बनावट कर्ज काढले. धुमाळ यांनी याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावर आगवणे याने त्यांच्याकडेच खंडणी मागितली. खंडणीस नकार दिल्यावर धुमाळ यांचे अपहरण करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्याकडील एक लाख रुपये जबरदस्तीने काढून घेत धुमाळ यांना जीवे मारण्याचाही प्रयत्न केला.

या गुन्ह्याच्या तपासात दिगंबर आगवणे याने त्याच्या टोळीची दहशत पसरवण्यासाठी फलटण तालुक्यातील इतर गुन्हेगारी टोळीतील सदस्यांना एकत्र आणून त्याच्या टोळीची दहशत पसरवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले. त्यामुळे फलटणचे पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी आगवणे व त्याच्या टोळीविरुध्द विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे मोक्कांतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार करून पाठविला होता. त्याला फुलारी यांनी मंजुरी दिली आहे.