Satara News : साताऱ्यात पुन्हा एकदा धारदार शस्त्राने हल्ला; हल्लेखोर फरार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
साधारणपणे महाराष्ट्र्रातील एक शांत जिल्हा आणि स्वराज्याची राजधानी असलेल्या साताऱ्यात गुन्हेगारीचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. गेल्या 8 दिवसात साताऱ्यात तब्बल पाच वेळा कोयत्याने हल्ला करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. आज पुन्हा एकदा धारदार शस्त्राने एकावर हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये सदर व्यक्ती जखमी झाला आहे तर हल्लेखोर मात्र घटनस्थळावरून पसार झाला आहे. या घटनेने साताऱ्यातील कायदा आणि सुव्यस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, सातारा शहरातील राजवाडा परिसरात असणाऱ्या राजधानी टॉवर येथे गणेश शंकर पैलवान नावाच्या व्यक्तीवर धारदार शस्त्राने वार करण्यात आलाय. या हल्ल्यात गणेश हे जखमी झाले आहेत. हल्ला करून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हल्ल्यातील जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी पुण्याला हलवले आहे. हा हल्ला नेमका कोणी केला आणि कोणत्या कारणातून झाला याची माहिती सध्या शाहूपुरी पोलीस घेत असून हल्लेखोरांचा तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, धारदार शस्त्राने हल्ला करण्याच्या घटना साताऱ्यात सातत्याने वाढत असल्याचे दिसत आहे. मागील 8 दिवसात तब्बल ५ वेळा साताऱ्यात कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या वाढत्या गुन्हेगारीमुळे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तसेच या वाढत्या घटनांमुळे सातारा पोलिसांचा वचक कमी तर झाला नाही ना अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.