Satara News : नवविवाहितेचा खून करून प्रेमवीराने घेतला गळफास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
प्रेम प्रकरणातून नवविवाहितेचा खून करून प्रेमवीराने आत्महत्या केल्याच्या घटनेने खटाव व कराड तालुक्यात खळबळ उडाली. वांझोळी (ता. खटाव) येथे रविवारी ही घडली. या घटनेत स्नेहल वैभव माळी (वय- 22, रा. शामगाव, ता. कराड) असे खून झालेल्या नवविवाहितेचे नाव आहे. तर दत्तात्रय सुरेश माळी (वय- 27, रा. वांझोळी, ता. खटाव) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी दत्तात्रय माळी याने एक चिठ्ठी लिहली होती, ती आपल्या मोबाईलवर स्टेटसही ठेवली होती.

पोलिसांकडून याबाबत मिळालेली माहिती अशी : वांझोळी येथील दत्तात्रय माळी व स्नेहल यांचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र, दोन महिन्यांपूर्वी स्नेहल हिचा शामगाव येथील युवकाशी विवाह झाला होता. शामगाव हे तिचे सासर असून दोन महिन्यांनंतर ती शनिवारी आपल्या माहेरी वांझोळीत आली होती. दत्तात्रय व स्नेहलचे घर काही अंतरावर आहे. रविवारी सायंकाळी दत्तात्रय याने ‘मला तुझ्याशी काही बोलायचे आहे’, असे सांगून स्नेहलला आपल्या घरी बोलावून घेतले होते. दरम्यान, घरात कोणी नसल्याचा फायदा घेत दत्तात्रय याने स्नेहल हिच्यावर चाकू आणि कोयत्याने सपासप वार केले. स्नेहलला वर्मी घाव लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर दत्तात्रय यानेही त्याच घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

काही वेळानंतर दत्तात्रय व स्नेहल यांच्या आई दोघीही एकत्रित दत्तात्रय याच्या घरी आल्या. त्यावेळी त्यांना स्नेहल रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली तर दत्तात्रय याने गळफास घेतल्याचे दिसून आले. हा प्रकार पाहून त्या हादरून गेल्या. यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबियांना याची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच औंध व पुसेसावळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश देशमुख, सपोनि दत्तात्रय दराडे यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेची रात्री उशिरापर्यंत औंध पोलिसात नोंद करण्याचे काम सुरु होते.