सातारा जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी; अतिवृष्टीमुळे जिल्हा प्रशासनाचा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात मागील ३-४ दिवसांपासून धुवाधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलं आहे तर काही ठिकाणी नदी नाले ओसंडून वाहत आहेत. पावसाचा जोर आणखी काही दिवस असाच सुरु राहण्याची शक्यता आहे. आज मुंबई, पुण्यात अनेक घरात पाणी शिरल्याचे चित्र पाहायला मिळालं. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे या पश्चिम महाराष्टाच्या घाट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. सातारा जिल्ह्यातील पावसाचे वाढते प्रमाण पाहता सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी (Satara School Closed) देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी याबाबत आदेश काढलेत.

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हयातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खासगी प्राथमिक व माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित व विना अनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना उद्या दि. 26 जुलै रोजी सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. शाळा व महाविद्यालयातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत संबधीत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे, तसेच इयत्ता 10 वी व 12 वी च्या जुलै 2024 च्या फेर परीक्षा राज्य मंडळ पुणे यांचे वेळापत्रकानुसार सुरू राहतील, असे जिल्हाधिकारी डूडी यांनी आदेशात म्हटले आहे.

दरम्यान, सातारा जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा दिवसापासून जोरदार पाऊस होत आहे. पूर्व भागातील दुष्काळी तालुक्यात ही पाऊस पडत आहे. तर पश्चिम भागातील जावळी, पाटण, सातारा, महाबळेश्वर, वाई, जावळी तालुक्यात संततधार सुरू आहे. तर उद्या शुक्रवारी जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. कोयना धरणातील पाणीसाठा 77.70 टीएमसीवर पोहोचला आहे. त्यामुळे पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.