हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Satara Tourist Places । सातारा जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी महत्वाची बातमी आहे. मागील काही दिवसापासून पश्चिम महाराष्टात मुसळधार पाऊस पडत आहे. नद्या, नाले दुथड्या भरून वाहत आहेत. अनेक भागात दरड कोसळल्याच्या घटनाही घडल्या. याच एकूण पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. सातारा जिल्ह्यातील महत्वाची पर्यटनस्थळे बंद करण्यात आली आहेत. महाबळेश्वर, वाई सह जिल्ह्यातील सर्व महत्वाची पर्यटनस्थळे 19 ऑगस्टपर्यंत बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतला आहे.
कोणकोणत्या पर्यटन स्थळांवर बंदी – Satara Tourist Places
अजिंक्यतारा किल्ला
ठोसेघर धबधबा
केळवली-सांडवली धबधबा
वजराई धबधबा
कास पुष्प पठार
एकीव धबधबा
कास तलाव
बामणोली
पंचकुंड धबधबा
सडावाघापूर उलटा धबधबा
ऊरुल घाट शिव मंदिर धबधबा
रुद्रेश्वर देवालय धबधबा
ओझर्डे धबधबा
घाटमाथा धबधबा
लिंगमळा धबधबा
वरील सर्व पर्यटन स्थळे हे सातारा जिल्ह्यातील महत्वाची पर्यटन स्थळे (Satara Tourist Places) आहेत. दरवर्षी -पावसाळ्यात याठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी बघायला मिळते. मात्र सध्याची पावसाची एकूण परिस्थिती आणि दरडी कोसळण्याच्या धोका यामुळे पर्यटकांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनाने सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी 19 ऑगस्ट पर्यंत या पर्यटन स्थळांवर निर्बंध घातले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. असेही सांगण्यात आले आहे.
अतिवृष्टीचे काळात मोठया प्रमाणात डोंगरातून पाण्याचा प्रवाह सुरु असतो. ओढे-नाले पात्र भरुन वाहत असतात अशावेळी ओढयानाल्यातून प्रवास टाळावा. तसेच ओढ्यावरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास धोकादायक स्थितीमध्ये पूल ओलांडू नये याबाबत विविध पध्दतीने प्रचार-प्रसिध्दी करावी. पर्यटनाचे ठिकाणी उदा. धबधबे, तलाव इ. ठिकाणी धोकादायक ठिकाणी प्रवेश करुन देऊ नये. त्याच प्रमाणे धोकादायक ठिकाणी फोटो काढण्याचे अथवा सेल्फी घेण्याच्या ठिकाणी सुरक्षित उपाययोजना राबवावी. अशा ठिकाणी धोक्याची सूचना देणारे व प्रवेश निषिध्द असणारे फलक लावावेत. नदी अथवा नाल्याची पाणी पातळी वाढल्यास कोणत्याही परिस्थितीत नदी पात्रात प्रवेश करु नये यासाठी संबंधितांना आप-आपल्या कार्यकक्षेतील सर्व नागरिकांना व ग्रामस्तरावरील यंत्रणेस वेळोवेळी सूचित करावे. तसेच पूलावरुन पाणी वाहत असताना पूल वाहतूकीसाठी तात्काळ बंद करावा, अशा मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केले आहे
आंबेनळी घाट बंद –
दरम्यान, रायगड आणि साताऱ्याला जोडणारा पोलादपूर आंबेनळी घाटामध्ये ३ ठिकाणी दरड कोसळण्याची घटना समोर आली आहे. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने संध्याकाळी 7 ते सकाळी 7 या वेळेत आंबेनळी घाट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील वाहतूक रात्रीच्या वेळेस बंद राहणार आहे. या भागात गेल्या काही दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे, तसेच घाटात दाट धुके पसरले आहे. परिणामी, दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन दोन्ही जिल्ह्यांतील प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पुढील आदेश येईपर्यंत हा घाट रोज रात्री बंद राहणार आहे.




