Satara Waterfalls : पावसाळ्यात फ्रेश फिलिंग देतील महाराष्ट्रातील ‘हे’ सुंदर धबधबे; इथे भरते निसर्गाची शाळा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Satara Waterfalls) पावसाळा म्हटलं की, प्रत्येकाच्या मनातले मोर थुईथुई नाचू लागतात. पावसाच्या सरी अंगावर झेलून मनसोक्त भिजण्याचा आनंद घेण्यात जी मजा आहे ती इतर कोणत्याच गोष्टीत नाही. त्यामुळे पावसाळ्यात जो तो फिरायला जाण्याचं प्लॅनिंग करत असतो. अशा दिवसात मनाला शांतता देणाऱ्या एखाद्या ठिकाणी क्षणभर का होईना विश्रांती घ्यावी असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे आजची बातमी अशा निसर्ग आणि पाऊस प्रेमींसाठी. आज आपण पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यात सुंदर अशा ५ धबधब्यांविषयी माहिती घेणार आहोत. जिथे पावसाळ्यात निसर्गाची वेगळीच शाळा भरते. ज्या शाळेत प्रत्येकाला जावेसे वाटते. चला तर जाणून घेऊया पश्चिम महाराष्ट्रातील टॉप ५ धबधबे.

1. ठोसेघर धबधबा (Satara Waterfalls)

ठोसेघर धबधबा हा राजधानी सातारापासून २६ किलोमीटर अंतरावर आहे. जर तुम्ही पुण्याहून इथे येत असाल तर तुम्हाला १४१ किलोमीटर अंतर कापावे लागेल. तसेच मुंबईतून येणार असाल तर २९४ किलोमीटर अंतर कापावे लागेल. एका छोट्याशा गावातील हा धबधबा अत्यंत नयनरम्य आहे. हा धबधबा शांत वातावरण आणि अलौकिक नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ या वेळेत भेट देता येते. खास करून पावसाळ्यात इथे पर्यटकांची मोठी गर्दी दिसते.

2. धारेश्वर धबधबा

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात धारेश्वर धबधबा आहे. जो पाटणपासून सुमारे १४ किलोमीटर अंतरावर आहे. तर साताऱ्यापासून सुमारे ८० किलोमीटर अंतरावर आहे. (Satara Waterfalls) धारेश्वर डोंगरामध्ये खोदलेल्या लेण्या आणि या लेण्यांमध्ये महादेवाचे व प्रभू श्रीरामाचे मंदिर आहे. हे एक अध्यात्मिक स्थळ असून अनेक पर्यटक या ठिकाणी महादेवाच्या दर्शनासाठी येत असतात. इथे पावसाचे प्रमाण वाढले की, डोंगरातून वाहणारे असंख्य धबधबे मन प्रसन्न करून टाकतात. त्यापैकी एक म्हणजे धारेश्वर.

3. सडावाघापूर धबधबा

सातारा जिल्ह्यातील चाफळ विभागात सडावाघापुर धबधबा आहे. तारळे पाटण रोडवर सुमारे १४ किलोमीटर अंतरावरील हा धबधबा उलटा धबधबा म्हणून ओळखला जातो. दरवर्षी पावसाला सुरुवात झाली की, पर्यटकांना या उलटया धबधब्याचे वेध लागतात. (Satara Waterfalls) विस्तीर्ण पठार, धुक्यात हरवलेल्या गगनचुंबी पवनचक्क्या, दाट धुके, थंडगार हवा आणि रिमझिम पाऊस असा सुंदर निसर्ग अनुभवायचा असेल तर एकदा तरी या धबधब्याला जरूर भेट द्या.

4. वजराई भांबवली धबधबा

वजराई भांबवली धबधबा हा महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात आहे. सातारा शहरापासून सुमारे ३२ किलोमीटर अंतरावर असलेल्या भांबवली गावात हा धबधबा आहे. प्रसिद्ध कास तलावापासून पुढे सुमारे ५ किलोमीटर अंतरावर या धबधब्याचे अत्यंत सुंदर आणि डोळ्याचे पारणे फिटेल असे विहंगम दृष्य पहायला मिळते. (Satara Waterfalls) या धबधब्याची उंची तब्बल १ हजार ८४० फूट इतकी असून आशिया खंडातील सर्वात उंच धबधबा म्हणून ‘भांबवली वजराई’ हा धबधबा ओळखला जातो. आसपास अत्यंत घनदाट जंगल असल्याने पावसाळ्यात हा परिसर हिरवाईने नटल्यासारखा दिसतो. देशातील सर्वात उंच असा हा धबधबा उरमोडी नदीत उगम पावतो.

5. एकिव धबधबा

सातारा जिल्ह्यात कास रोडवर पारंबो फाट्यापासून साधारण ४ किलोमीटर अंतरावर एकिव धबधबा आहे. कास पठारावरून पडणारे पावसाचे पाणी या धबधब्यातून खाली पडते. (Satara Waterfalls) कास पुष्प पठाराला भेट देणारे पर्यटक या ठिकाणी हमखास जातात. अत्यंत सुंदर, नयनरम्य आणि मनमोहक दृश्यांसाठी हा धबधबा प्रसिद्ध आहे. सातारा शहरातून बामणोलीला जाणाऱ्या एसटी बसने किंवा खासगी गाड्यांनीसुद्धा या ठिकाणी जाता येते.