स्त्री म्हणजे प्रजोत्पादनाचे मानवी साधन, स्त्री ही पायाची दासी असून तिने पुरुषाच्या सुखासाठी उभे आयुष्य खर्च करावे, स्त्रीने शिक्षण घेणे म्हणजे धर्म बुडविणे, स्त्री शिकायला लागली की विधवा होते अशा खुळचट समजुती ज्या समाजात रूढ होत्या, त्या समाजात स्त्रियांच्या शिक्षणासाठी झटणारी देशातील पहिली महिला शिक्षिका, सनातन्यांकडून होणाऱ्या हल्यांना न घाबरता शिक्षणातून प्रतिगामी समाजात क्रांतीची बीजे रोवणारी धाडसी महिला समाजसुधारक म्हणजे सावित्रीबाई फुले होय.
महात्मा फुल्यांनी सावित्रीला शिकवून समाजसुधारणेची सुरवात स्वतःच्या घरापासून केली. सावित्रीच्या रूपाने त्यांनी स्त्री शिक्षणाच्या बिजाचे रोप लावले. त्या रोपाचे मोठया वटवृक्षात रूपांतर होऊन प्रतिगामी समाजाच्या विचाराला चालना मिळाली. स्त्रिया शिकल्या तरच त्यांच्यावरील पिढ्यानपिढ्या होत असलेला अन्याय दूर होईल. स्त्री शिक्षणामुळे बुरसटलेला समाज देखील शहाणा होईल म्हणून फुल्यांनी 1 जानेवारी 1848 रोजी सनातन्यांच माहेरघर असलेल्या पुण्यातील भिडे वाड्यात भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. देशातील या पहिल्या मुलींच्या शाळेची पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले झाल्या. मुलींना शिकवण्याच धाडसी काम त्यांनी हाती घेतलं. फक्त मुलींसाठीच शाळा काढुन ते थांबले नाहीत तर ज्या समाजाला पाणी पिण्याचा अधिकार नाकारला होता, ज्यांची सावली पडली तरी विटाळ होत होता अशा महार, मांग आणि चांभार यांच्या मुलामुलींसाठी देखील त्यांनी शाळा सुरू केल्या.1848 ते 1852 पर्यंत त्यांनी अठरा शाळा सुरू केल्या होत्या. प्रतिगामी समाजात हे काम करणं सोप्प नव्हतं. ज्या जोतिबांना शूद्र आहेस म्हणून ब्राह्मणांच्या वरातीतून हाकलून दिले त्यांनीच आपल्या पत्नीस शिकवून तिच्याकडून ब्राह्मणांच्या मुलींना शिकविण्याचा त्यांच्या बालेकिल्यात प्रयत्न करणे मोठे धाडसाचे काम होते. त्यांच्या बालेकिल्ल्यात राहून महार,मांगासाठी शाळा उघडून त्यांना समाजाचे घटक बनविणे हे तर त्याहून मोठे धाडसाचे काम होते. सावित्रीबाई फुले शाळेला जात असताना सनातनी लोकांकडून त्यांच्यावर चिखलाचा,शेणाचा,दगडाचा मारा करण्यात आला. कुचेष्टा केली, शिव्याशाप दिले. हा सर्व मानसिक आणि शारीरिक छळ सहन करत सावित्रीबाई मोठ्या धैर्याने लढत राहिल्या. शाळेच्या पहिल्या दिवशी फक्त सहा मुली होत्या. मुली शिकू लागल्या. शाळेत मुलींची संख्या वाढावी म्हणून ज्योतीराव आणि सावित्री यांनी पालकांना स्त्री शिक्षणाच महत्व पटवून दिले. हळूहळू शाळेतील मुलींची संख्या वाढू लागली. आपली मुलगी शिकतेय याचा पालकांनाही आनंद होऊ लागला मात्र हे सर्व सनातनी लोकांना सहन होणे शक्य नव्हते. सावित्रीबाईंच्या शाळेला प्रसिद्धी मिळत असल्यामुळे सनातन्यांचा जळफळाट झाला. त्यांनी सावित्रीबाईंची वाट अडवायला गुंड पाठवले. गुंड सावित्रीबाईंच्या अंगावर येऊ लागले त्यावेळी सावित्रीबाई फुले यांच्यातील रणरागिणी जागी झाली. त्यांनी गुंडाच्या कानशिलात लगावली. सावित्रीच्या त्या रौद्र अवतारापुढे सनातन्यांची पळता भूई थोडी झाली. यानंतर सावित्रीच्या वाटेस कोणी जाण्याची हिंमत केली नाही. एवढ्यावर सनातनी गप्प कसे बसणार? त्यांनी धर्मनिष्ठ,भोळ्या असणाऱ्या जोतिरावांच्या वडीलांवर म्हणजे गोविंदरावांवर धर्माची भिती दाखवून दबाव निर्माण केला. सनातनी प्रवृत्तीला ते बळी पडले. गोविंदराव जोतिरावांना म्हणाले,”तुझं काम नाही ना पटत ब्राह्मण समाजाला, मग दे सोडून ते काम आणि शेतीवाडी कर. स्त्रीयांना, शूद्राला शिक्षणाचा अधिकार नाही तर त्याच्यासाठी अट्टाहास का करतोस? ” जोतीराव आपल्या ध्येयावर ठाम होते. सनातन्यांच्या दबावाला बळी पडलेल्या गोविंदरावांनी नाईलाजाने, मोठ्या जड अंतःकरणाने, जोतिरावांना घराबाहेर जाण्यास सांगितले. शिक्षणाच्या पवित्र कार्यात स्वतःला झोकून देणाऱ्या सावित्रीनेही आपल्या पतीला साथ दिली. समाजाच्या उद्धारासाठी जोतीराव आणि सावित्रीबाईंना स्वतःच्या घराचा त्याग करावा लागला. सावित्रीबाईंचे कार्य केवळ शिक्षणापुरते मर्यादीत राहीले नाही. बालवयात विधवा झालेल्या स्त्रीयांवर त्यांच्या तरुणपणात पुरुषांकडून अत्याचार होत असत. पुरुष स्वतःची वासना पूर्ण करून मोकळे होत पण त्या अत्याचाराचे गंभीर परिणाम स्त्रियांना भोगावे लागत. अत्याचारामुळे गरोदर राहिलेल्या विधवा स्त्री पुढे दोनच मार्ग होते एक भ्रूणहत्या आणि दुसरा आत्महत्या. विधवा स्त्रियांची ही अडचण दूर करण्यासाठी जोतिरावांनी सावित्रीबाईच्या मदतीने 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. अनेक तरुण विधवांच्या आत्महत्या,भ्रूणहत्या या गृहामुळे रोखल्या गेल्या. विधवांना नको असलेल्या बाळाचा सांभाळ स्वतः सावित्रीबाईंनी केला. विधवा स्त्रियांचे केशवपन ही त्या काळातील अनिष्ट प्रथा होती. या अनिष्ट प्रथेविरुद्ध आवाज उठविण्याची विनंती सावित्रीबाईंनी जोतिरावांकडे केली. जोतिरावांनी केशवपन प्रथेविरुद्ध नाभिकांचा संप घडवून आणला. माणुसकीला काळीमा फासणारे हे घृणास्पद कृत्य न करण्याचे आवाहन त्यांनी नाभिक समाजाला केले. नाभिक समाजानेही जोतिरावांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला. सावित्रीबाईंच्या प्रेरणेने जोतिरावांनी घडवून आणलेल्या या संपामुळे केशवपनाची प्रथा कमी होण्यास मदत झाली. विधवा पुनर्विवाहासाठी त्यांनी प्रयत्न केले. अस्पृश्यांच्या स्पर्शाने विटाळ होतो म्हणून त्यांना जगण्यासाठी आवश्यक असणारे पाणी देखील दिले जात नव्हते अशावेळी जोतिरावांनी घरातील पाण्याचा हौदच अस्पृश्यांसाठी खुला केला ही मोठी क्रांतिकारक घटना होती. सनातनी पेशव्यांनाच त्यांनी आव्हान दिले होते. जोतिरावांच्या आयुष्यातील अशा प्रत्येक क्रांतिकारी घटनेला सावित्रीबाईंनी मोलाची साथ दिली.
सावित्रीबाई माहेरी गेल्यावर त्यांचा भाऊ त्यांना म्हणाला की तू व तुझ्या नवऱ्याला वाळीत टाकले असून तुम्ही दोघे महार मांगासाठी जे काम करता ते पाप आहे त्यामुळे आपल्या कुळास बट्टा लागला आहे. तुम्ही नवरा बायकोने जातीप्रथेस अनुसरून व भट सांगेल त्याप्रमाणे आचरण करावे” सनातनी लोकांनी पेरलेले जातीचे विष किती खोलवर रुजले होते याची प्रचिती सावित्रीबाईंच्या भावाने केलेल्या या संवादातून दिसून येते. सावित्रीने त्याला समजावून सांगितले, भट लोक जेव्हा सोवळ्यात असतात तेव्हा तुला विटाळच मानतात, तुला पण महारच समजतात, आम्ही मुलींना महार, मांगांना शिकवतो, विद्या देतो हेच त्यांना नकोय म्हणून ते लोक असे वागतात”
अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे अंथरुणाशी खिळलेल्या पतीची सेवा सावित्रीबाई करत राहिल्या. अखेरच्या क्षणी सावित्रीबाईंविषयी कृतज्ञता व्यक्त करताना महात्मा फुले म्हणतात, सावित्रीने माझ्यासोबत 50 वर्षे जीवनप्रवास केला. तिच्या साथीमुळेच मी समाजोपयोगी काम करू शकलो. या काळात तिने खूप हालअपेष्टा सोसल्या, मानहानी पत्करली पण ती मानवतेच्या कार्यापासून तसूभरही ढळली नाही” सामाजिक कार्यामुळे घराकडे दुर्लक्ष झाले. आर्थिक परिस्थिती खालावली. या सर्व बिकट परिस्थितीला सावित्रीबाईंनी धैर्याने तोंड दिले. जोतिरावांच्या अंत्ययात्रेसाठी दत्तक पुत्र यशवंताने हातात टिटव धरल्यावर भाऊबंदकीने मोठा गहजब केला. या गोंधळाला थांबविण्यासाठी सावित्रीबाई स्वतः पुढे आल्या आणि त्यांनी ते टिटव हातात घेतले. एवढेच नाही तर जोतिरावांच्या चितेला त्यांनीच अग्नी दिला. सावित्रीबाईंच जीवन अशा क्रांतिकारी घटनांनी वेढलेले आहे. जोतिरावांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाची धुरा सावित्रीबाईंनी यशस्वीपणे सांभाळली. सावित्रीबाई फुलेंच संपूर्ण जीवनच संघर्षाने व्यापून टाकणारे आहे. त्यांनी केलेल्या संघर्षामुळे आजची स्त्री विविध क्षेत्रात भरारी घेत आहे, परंतू अतिशय वेगवान झालेल्या या आपल्या जीवनात आपण सावित्रीबाईंनी केलेलं महान कार्य विसरत चाललोय हे अतिशय खेदाने नमूद करावं लागतंय. केशवपन, बालविवाह इत्यादी धर्माच्या नावावर महिलांवर अन्याय करणाऱ्या प्रथांविरुद्ध टोकाची प्रतिकूल परिस्थिती असताना सावित्रीबाई लढल्या. आजच्या मुली स्वतःला सावित्रीच्या लेकी म्हणवून घेतात पण हुंड्यासारख्या अन्यायकारी प्रथेला साधा विरोध सुद्धा करत नाहीत, हे दुर्देव आहे. आजही या पुरुषप्रधान समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते. लग्न झाल्यावर मुलीनेच मुलाच्या घरी का जायचं? मुलीनेच मंगळसूत्र का घालायचे? मुलीनेच स्वयंपाक, घरकाम का करायचे? हे प्रश्न आतापर्यंत किती मुलींनी या पुरुषप्रधान समाजाला विचारले? धर्म आणि परंपरेच कारण पुढे करून हा पुरुषप्रधान समाज आजही स्त्रियांना दुय्यमच लेखतोय. मासिक पाळीच कारण पुढे करून महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही. सावित्रीच्या लेकींनी अशा प्रथेविरुद्ध आवाज उठविणे अपेक्षित आहे. विविध क्षेत्रात महिला प्रगती करीत असल्या तरी आजही महिलांचा सामाजिक,राजकीय सहभाग कमी आहे. चूल आणि मुल एवढ्यापुरतच जीवन असणारी एकेकाळची स्त्री आता विविध क्षेत्रात भरारी घेऊन स्वतःच कर्तृत्व सिद्ध करत असलं तरी सावित्रीच्या लेकींचा संघर्ष अजून संपलेला नाही. कारण आजही बराचसा समाज स्त्रीकडे वस्तू म्हणूनच बघतोय या मानसिकतेविरुद्ध सावित्रीबाईंच्या लेकींना लढावे लागेल.
- मयुर डुमणे