भारतात बनावट यकृत औषधांची विक्री? WHO ने दिली चेतावणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सोमवारी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारतात आणि तुर्कीमध्ये विकल्या जाणार्‍या बनावट यकृताच्या औषधाविरूद्ध अलर्ट जारी केला आहे. भारतात आणि तुर्कीमध्ये यकृताच्या आजारावर डिफिब्रोटाइड अशा नावाचे बनावट औषध विकले जात  आहे. यासंदर्भात WHO ने अलर्ट जारी केला आहे. डिफिब्रोटाइड हे बनावट औषध नियमन पद्धतीने विकले जात असल्याची माहिती यूएन आरोग्य संस्थेने एका अहवालात दिली आहे.

WHO चे आवाहन

त्यामुळे WHO ने  आवाहन केले आहे की, “तुम्ही, किंवा तुमच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीने प्रभावित उत्पादन वापरले असेल किंवा वापरत असेल आणि त्याला काही दुष्परिणाम जाणून येत असतील तर तुम्ही त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या. यानंतर या सर्व घडलेल्या प्रकाराची राष्ट्रीय नियामक प्राधिकरण, नॅशनल फार्माकोव्हिजिलन्स सेंटरकडे तक्रार नोंदवा. जर आरोग्य अधिकाऱ्यांनी ही खोटी उत्पादने ओळखली तर WHO ला ताबडतोब सूचित करण्याचा सल्ला दिला जातो आणि त्यावर कारवाई होते”

WHO ने जारी केलेल्या अलर्टमध्ये म्हटले आहे की, यकृतावर DEFITELIO नावाने बनावट औषध विकले जात आहे. या औषधांची विक्री तुर्की आणि भारतात झाली आहे. हे औषध नियमन केलेल्या अधिकृत चॅनेलच्या बाहेर पुरवले गेले आहे. DEFITELIO पॅकेजिंगवरील तारीख आणि नोंदणीकृत माहिती खोटी आहे. नमूद अनुक्रमांक बॅच 20G20A शी संबंधित नाही. तसेच या औषधाला भारतात आणि तुर्कीमध्ये विपणन अधिकृतता नाही.

त्याचबरोबर, “हेमॅटोपोएटिक स्टेम-सेल ट्रान्सप्लांटेशन (HSCT) थेरपीमध्ये DEFITELIO औषध गंभीर यकृताच्या वेनो-ऑक्लुसिव्ह रोग (VOD) च्या उपचारांसाठी दिले जाते. ज्याला सायनसॉइडल ऑब्स्ट्रक्टिव्ह सिंड्रोम देखील म्हणतात. VOD ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये यकृतातील नसा अवरोधित होतात आणि अवयव योग्यरित्या कार्य करण्यास थांबतात. त्यामुळे मानवाच्या आरोग्याला धोका निर्माण होतो.” अशी माहिती WHO ने दिली आहे.

मुख्य म्हणजे, यापूर्वी WHO च्या तपासात हे औषध अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, लाटविया, मलेशिया आणि सौदी अरेबिया सारख्या देशांमध्ये विकले जात असल्याचे आढळले होते. आता पुन्हा या बनावट औषधाची विक्री होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे, “तुम्ही जर या नावाचे औषध वापरले असेल आणि तुम्हाला त्यातून काही त्रास जाणवत असेल तर तुम्ही त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यावर उपचार करा” असे आवाहन आरोग्य संघटनेने केले आहे.