शरद पवारांना पंतप्रधान तर अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याच स्वप्न.., रामराजेंच सूचक वक्तव्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर शिंदे फडणवीस गटात गेलेल्या अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाविषयी अनेक दावे केले जात आहेत. मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिले असले तरी लवकरच त्या जागी अजित पवार पाहायला मिळतील असे थेट वक्तव्य अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या आमदारांकडून करण्यात येत आहे. मुख्य म्हणजे, या सर्व पार्श्वभूमीवर पुन्हा अजित पवार गटाचे ज्येष्ठ आमदार रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Nimbalkar) यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. ‘आम्ही जसे शरद पवारांसाठी पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहिले होते तसेच अजित पवारांना राज्याचे मुख्यमंत्री करण्याचं स्पप्न पाहत आहोत’ असे निंबाळकर यांनी म्हणले आहे.

काय म्हणाले रामराजे निंबाळकर

बुधवारी साताऱ्यात असताना रामराजे निंबाळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी, “१९९९ ला आम्ही शरद पवारांना (Sharad Pawar) पंतप्रधान करण्यासाठीची स्वप्नं पाहिली होती. त्याच पद्धतीने आता अजित पवारांना राज्याचे मुख्यमंत्री करण्याचं स्पप्न आम्ही पाहातो आहोत” असे सूचक वक्तव्य केले आहे. पुढे बोलताना, अजित पवारांशिवाय आम्हाला महाराष्ट्रात दुसरा माणूस दिसत नाही ज्याच्यात फक्त सातारा जिल्हा नव्हे तर महाराष्ट्राला २१ व्या शतकातलं एक प्रमुख राज्य करण्याची क्षमता असल्याचा विश्वास निंबाळकर यांनी अजित पवारांवर दाखवला आहे.

….त्यासाठीच आम्ही एकत्र आलो

यासोबतच, “अजित पवारांना योग्य वेळी मुख्यमंत्री करायचं आहे. त्यासाठीच आम्ही एकत्र आलो आहोत” असे रामराजे निंबाळकर यांनी म्हणले आहे. आता त्यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय याबाबत अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. दरम्यान, आगामी निवडणुकांसाठी शरद पवार राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन लोकांशी संवाद साधत आहेत. आता त्यांच्या पाठोपाठच अजित पवार गटाचे नेते देखील त्याच भागात जाऊन प्रचार करताना दिसत आहेत. त्यामुळे पक्षाच्या दोन्ही गटांमध्ये आता कुरघोडी करण्याची चुरस लागल्याचे पाहिला मिळत आहे.

अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाविषयी राज्यात अनेक वेगवेगळ्या चर्चा सुरू असल्या तरी आपल्याला या पदामध्ये रस नसल्याचे अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे सध्या अजित पवार यांनी आगामी निवडणुकांवर लक्ष केंद्रित करून आपले प्रचार दौरे सुरू केले आहेत. तर दुसऱ्या बाजूला शरद पवार यांच्या देखील सभा होत आहेत. यामुळे आगामी निवडणुकात हे दोन्ही घट आमने-सामने भिडतील यात काही शंका नाही.