शाब्बास रे पठ्ठ्या : रस्त्यात ऊसाने भरलेल्या ट्राॅलीची पीन तुटली पण बारावीच्या पोरानं असं धाडस दाखवलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
बारावीत शिकणाऱ्या मुलाने दाखवले प्रसंगावधान दाखवून अनेकांचे प्राण वाचवले. जीवावर उदार होऊन मागे घसरणाऱ्या ऊसाने भरलेल्या ट्रॉलीला दगड लावला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सदरील घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या धाडसाबद्दल विवेकला ग्रामपंचायत 26 जानेवारीला होणार शौर्य पुरस्कार देऊन सन्मान करणार आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कराड तालुक्यातील येरवळे भागात सध्या ऊस तोडीची लगबग जोरात सुरू आहे. यामुळे उसाने भरलेले ट्रॅक्टर यांची वाहतूक नेहमीच सुरू असते. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास भरवस्तीतून बाजार तळा जवळील मेन रस्त्याने चाललेल्या उसाने भरलेल्या पाठीमागच्या ट्रॉलीची जोड पिन तुटली. पिन तुटल्याने ऊसाने भरलेली ट्राॅली वेगाने पाठीमागच्या घराच्या दिशेने जाऊ लागली. याचवेळी पाठीमागून रस्त्याने चारचाकी, दुचाकी गाड्या येत होत्या. तसेच पादचाऱ्यांचेही वर्दळ सुरू होती. याचवेळी विवेक बाजीराव यादव हा विद्यार्थी किराणा दुकानात चालला होता. त्याच्या समोर घडणारा हा प्रसंग पाहताच, त्यांनी आपल्या जीवाची परवा न करता एक मोठा दगड पाठीमागील चाकाजवळ टाकला. मात्र, ट्रॉली वेगाने घसरत असल्याने तो दगड फुटला. त्यांने लगेच दुसरा मोठा दगड चाकाखाली टाकला. त्यामुळे ट्रॉलीचा वेग कमी होऊन ट्रॉली थांबली. यामुळे अनेकांचे प्राण तर वाचलेच आणि मोठा अनर्थही टळला.

विवेक यादव यांनी आपल्या जीवाची बाजी लावत ट्रॉली थांबवली. कठीण प्रसंगी विवेकने दाखवलेल्या धैर्याचे येरवळे ग्रामस्थांमधून मोठे कौतुक होत आहे. या शौर्याबद्दल विवेक आणि त्याची आई यांचा सन्मान ग्रामपंचायत सदस्य कविता यादव, प्रेरणा ग्राम संघाच्या सदस्या कल्पना यादव, लक्ष्मी लोकरे यांनी केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य कविता यादव यांनी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी येरवळे ग्रामपंचायतच्या वतीने विवेकला शौर्य पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार असल्याचे सांगितले. सदरची पीन तुटून पाठीमागे घसरत येणारे ट्रॉली आणि विवेकने दाखवलेले प्रसंगावधान ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.