हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Shahaji Bapu Patil । सध्या महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप या मित्रांमध्ये अंतर्गत संघर्ष सुरु असल्याच्या चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे शिंदेंचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जाणाऱ्या सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापेमारी पडल्याने खळबळ उडाली. निवडणूक प्रक्रियेतील भरारी पथकाने शहाजीबापू यांच्या कार्यालयाची झाडाझडती घेतली. यानंतर उद्दिग्न झालेल्या शहाजीबापुनी थेट राजकारण सोडण्याचीच टोकाची भूमिका मांडली आहे. तसेच याबाबत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करु असे ते म्हणाले. त्यामुळे सांगोल्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीची शक्यता आहे.
काय म्हणाले शहाजीबापू पाटील ? Shahaji Bapu Patil
‘हे जे सगळं काही चाललं आहे ते चुकीच्या दिशेने राजकारण सुरू आहे. आज या परिस्थितीत माझ्या मनात राजकारण सोडून देण्याचा विचार येतोय. मी आता थांबण्याचा विचार करतोय, कारण अशा प्रकारचं राजकारण सांगोल्यात यापूर्वी कधीही झालं नाही. आजपर्यंतच्या माझ्या राजकीय कारकिर्दीत मी अनेक निवडणुका लढवल्या पण अशी कारवाई कधी झाली नाही.सांगोल्याच्या स्वाभिमानी जनतेने हे सगळ पहावं. या धाडीमागे सांगोला मधील माजी आमदार दीपक साळुंखे आणि पालकमंत्री आहेत. जय कुमार गोरे यांच्या हाताला धरून त्याने हे काम केलं आहे असा नाव घेऊन थेट आरोपच शहाजी पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपावर आता जयकुमार गोरेंकडून काय प्रतिक्रिया येते ते पहायला हवं.
सांगोल्यात नेमकं काय घडतंय ?
एकीकडे महाराष्ट्रात भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची युती असताना दुसरीकडे सांगोल्यात मात्र वेगळंच चित्र बघायला मिळतेय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप, शेकाप आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांनी युती करत शहाजीबापूना (Shahaji Bapu Patil) खिंडीत गाठलं आहे. भाजप आणि शहाजीबापू यांच्यात यामुळे वादाची ठिणगी पडली. जयकुमार गोरे यांच्यावर शहाजीबापू यांनी शेलक्या शब्दात टीकाही केली होती. त्यातच काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सांगोल्यात सभा झाली होती. या सभेत फडणवीस यांनी बापूंवर कोणतीही टीका केली नसली तरी शेकाप बरोबर झालेल्या युतीमुळे आपल्याला आनंद झाल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यामुळे भाजपने शहाजीबापू पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम केला कि काय अशी चर्चा सांगोल्यात सुरु आहे.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
दुसरीकडे उपमुख्यमंत्री आणि शहाजीबापू पाटील यांच्या पक्षाचे सर्वोच नेते एकनाथ शिंदे याना या धाडीबद्दल विचारलं असता जी काही चौकशी होत आहे, त्यामध्ये काही गांभीर्याने घेण्यासारखं नाही, असे त्यांनी म्हटले.




