हॅलो महाराष्ट ऑनलाईन Shaktipeeth Expressway Tunnel । मागच्या काही वर्षात महाराष्ट्रातील रस्ते वाहतुकीत मोठा बदल घडला आहे. अनेक जिल्ह्यात महामार्ग, आणि रेल्वेचे जाळे मजबूत झालं आहे. मागील महिन्यात समृदी महामार्गाचे कामही पूर्ण झाले. आता गोवा ते नागपूर शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारने संपूर्ण जोर लावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता एक्सप्रेसवे पूर्ण करण्याच्या बाजूने ठाम भूमिका घेतली आहे. शक्तीपीठ महामार्ग पूर्णत्वास नेण्याच्या दिशेने सरकार पाऊले टाकत आहे. पण तुम्हाला माहितेय का? या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गावर देशातील सर्वात मोठा बोगदा उभारला जाणार आहे. या बोगद्यामुळे तब्बल ९० मिनिटांचा प्रवास अवघ्या २० मिनिटांवर येणार आहे. हा बोगदा नेमका कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात येईल? त्याची वैशिष्ट्ये काय असतील? याबाबत संपूर्ण माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
90 मिनिटांचा प्रवास अवघ्या 20 मिनिटात पूर्ण होणार – (Shaktipeeth Expressway Tunnel)
आम्ही तुम्हाला ज्या बोगद्याबद्दल सांगतोय तो बोगदा (Shaktipeeth Expressway Tunnel) कोल्हापूर-सिंधुदुर्ग पट्ट्यात, निसर्गरम्य अंबोली प्रदेशाजवळील आजरा आणि बांदा दरम्यान बांधला जाणार आहे. खरं तर हा भाग शक्तीपीठ महामार्गाच्या चौथ्या टप्प्यात मोडतो, पण याठिकाणी २ मोठे बोगदे असणार आहेत. हा बोगदा तब्बल २९.९ किलोमीटर लांब असेल, ज्यामुळे तो देशातील सर्वात जास्त लांबीचा बोगदा ठरेल. नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाचा महत्वाचा भाग म्हणून या बोगद्याकडे बघितलं जाईल. एकदा हा बोगदा पूर्ण झाला कि प्रवाशांचे ३९ किलोमीटर अंतर वाचेल. ज्या प्रवासासाठी ९० मिनिटांचा वेळ लागणार होता तो प्रवास या बोगद्यामुळे अवघ्या २० मिनिटात पूर्ण होणार आहे.
दरम्यान, नागपूर – गोवा शक्तीपीठ महामार्ग हा राज्य सरकारचा आणखी एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. ६ पदरी असलेल्या या एक्सप्रेसवेची लांबी 802 किलोमीटर आहे. हा मार्ग वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होऊन गोव्यातील पत्रादेवी येथे संपेल. महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्रांना जोडून पर्यटनाला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. हा प्रकल्प प्रवास, पर्यटन आणि व्यापारासाठी नक्कीच गेमचेंजर ठरेल असं बोललं जातंय. सध्या नागपूर ते गोवा रस्त्याने जायचं झाल्यास 18-22 तास लागतात. या महामार्गामुळे हाच प्रवास 9 ते 10 तासांवर येईल.
कोणकोणत्या जिल्ह्यातून जाणार शक्तीपीठ महामार्ग –
नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग नागपूर, वर्धा. यवतमाळ, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून जाईल.
कोणकोणत्या तीर्थक्षेत्रांना जोडणार –
या महामार्गाच्या माध्यमातून,माहूर,तुळजापूर, कोल्हापूर, आंबाजोगाई, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी. कणेरी, पट्टणकडोली, सिद्धरामेश्वर आदमापूर, पत्रादेवी (गोवा) या सर्व क्षेत्रांना जोडण्यात येईल.