Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गामुळे महाराष्ट्र कर्जबाजारी होणार? वित्त विभागाचा इशारा

Shaktipeeth Mahamarg
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Shaktipeeth Mahamarg। नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग हा राज्य सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प मानला जातोय. नुकतंच राज्य मंत्रिमंडळाने या महामार्गाच्या भूसंपादनासाठी २०,७८७ कोटी रुपयांची आर्थिक मंजुरी दिली आहे. मात्र यानंतर अवघ्या ३ दिवसांतच अर्थ विभागाकडून आर्थिक संकटाचा इशारा देण्यात आला. शक्तिपीठ महामार्गाचा भूसंपादन खर्च, वाढीव व्याजदर आणि अंमलबजावणीवर वित्त विभागाने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच या शक्तीपीठ महामार्गामुळे महाराष्ट्राच्या कर्जात वाढ होईल असं मत वित्त विभागाच्या अहवालात व्यक्त करण्यात आलं आहे.

वित्त विभाग हे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात काम करते. वित्त विभागाने या अहवालात म्हटले आहे की शक्तीपीठ प्रकल्पासाठी( Shaktipeeth Mahamarg) राज्यावर २०,७८७ कोटी रुपयांचे मोठे आर्थिक दायित्व असेल. अर्थसंकल्पीय अंदाजानुसार, मार्च २०२६ पर्यंत राज्य सरकारवर एकूण ९.३२ लाख कोटी रुपयांचे कर्जाचा बोजा पडण्याची शक्यता आहे. नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादनासाठी मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या २०,७८७ कोटी रुपयांच्या कर्जाच्या हमीमुळे राज्यावर आर्थिक ताण वाढेल आणि अर्थसंकल्पाबाहेरील कर्जामुळे राज्याच्या कर्ज घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होईल, असे वित्त विभागाने म्हंटल आहे.

राज्य सरकार शक्तीपीठ महामार्गासाठी हुडकोकडून जे कर्ज घेणार आहे. या कर्जाचा व्याजदर ८.८५ टक्क्यांपेक्षा कमी नसेल. राज्य सरकारने खुल्या बाजारातून कर्जरोख्याद्वारे उभारलेल्या रकमेचा व्याजदर ६.७५ टक्के इतका आहे. म्हणजेच हुडकोकडून २.१ टक्के जास्त व्याजदराने हे कर्ज घेतले जाणार आहे. एवढ्या व्याजदराने कर्जाची परतफेड करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही.

कसा आहे शक्तीपीठ महामार्ग – Shaktipeeth Mahamarg

नागपूर – गोवा शक्तीपीठ महामार्ग हा राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. ६ पदरी असलेल्या या एक्सप्रेसवेची लांबी 802 किलोमीटर आहे. हा मार्ग वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होऊन गोव्यातील पत्रादेवी येथे संपेल. महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्रांना जोडून पर्यटनाला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. हा प्रकल्प प्रवास, पर्यटन आणि व्यापारासाठी नक्कीच गेमचेंजर ठरेल असं बोललं जातंय. सध्या नागपूर ते गोवा रस्त्याने जायचं झाल्यास 18-22 तास लागतात. या महामार्गामुळे हाच प्रवास 9 ते 10 तासांवर येईल.

कोणकोणत्या जिल्ह्यातून जाणार शक्तीपीठ महामार्ग –

नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग (Shaktipeeth Mahamarg) नागपूर, वर्धा. यवतमाळ, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून जाईल.

कोणकोणत्या तीर्थक्षेत्रांना जोडणार –

या महामार्गाच्या माध्यमातून,माहूर,तुळजापूर, कोल्हापूर, आंबाजोगाई, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी. कणेरी, पट्टणकडोली, सिद्धरामेश्वर आदमापूर, पत्रादेवी (गोवा) या सर्व क्षेत्रांना जोडण्यात येईल.