‘शंभरीच्या शांताबाई’; मुंबईत रंगणार प्रसिद्ध कवयित्री शांता शेळकेंच्या निवडक गाण्यांची सुरेल मैफिल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई। ‘रेशमाच्या रेघांनी,’ ‘गणराज रंगी नाचतो,’ ‘तोच चंद्रमा नभात,’ ‘मराठी पाऊल पडते पुढे’ अश्या असंख्य गाण्यांच्या यशामागचं नाव म्हणजे गीतकार ‘शांता शेळके.’ गेल्या १२ ऑक्टोबर २०२२ रोजी कवयित्री, गीतकार शांता शेळके यांची शंभरी पूर्ण झाली. यानिमित्त त्यांच्या काही निवडक गाण्यांचा ‘अमिथी’ संस्थेने ‘शंभरीच्या शांताबाई’ हा संगीतमय कार्यक्रम श्रोत्यांसाठी सादर केला. प्रथम विलेपार्ले, मुंबई येथे ६ ऑक्टोबर रोजी हा कार्यक्रम सादर झाला आणि याला रसिक श्रोतेमंडळींनी चांगला प्रतिसाद दिला. यानंतर आता या कार्यक्रमाने नाशिकदेखील गाजवलं आहे. पुढे ठाणे आणि बोरिवली भागात हा कार्यक्रम सादर होणार आहे.

प्रख्यात कवयित्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘अमिथी’ संस्थेच्या वतीने १५ ऑक्टोबर रोजी, नाशिक येथे महाकवी कालिदास कलामंदिरात हा कार्यक्रम रंगला. ‘गणराज रंगी नाचतो’ पासून या मैफलीला प्रारंभ झाला. ‘मागे उभा मंगेश’, ‘तोच चंद्रमा नभात’, ‘काय बाई सांगू’, ‘पप्पा सांगा कुणाचे’, ‘काटा रुते कुणाला’, ‘जय शारदे वागेश्वरी’, ‘शारद सुंदर चंदेरी’, ‘रेशमाच्या रेघांनी’, ‘ही चाल तुरूतुरू’ ही शांताबाईंनी लिहिलेली गाणी व त्यासोबतच त्यांची जीवनकहाणी यावेळी सादर करण्यात आली. अमृता दहिवेलकर, बागेश्री पांचाळे, अश्विनी आपटेकर, प्रमोद तळवडेकर, निकेत इंगळे यांनी गायन केले. तर किरण यादव, प्रथमेश मोहिते, सतेज करंदीकर, नीलेश माळी, योगेश कांबळे, योगेश सावंत, नीतेश जाधव यांनी साथसंगत केली. सचिन सुरेश यांनी निवेदन केले.

ज्या रसिकांना शंभरीच्या शांताबाई या कार्यक्रमाचा आनंद लुटण्याची संधी मिळालेली नाही, त्यांनी येत्या प्रयोगाला निश्चित उपस्थिती द्यावी. येत्या २७ ऑक्टोबर २०२२ रोजी, गुरुवारी, राम गणेश गडकरी रंगायतन ठाणे (प) येथे रात्री ८.३० वाजता हि सुरेल मैफिल रंगणार आहे. त्यानंतर पुढे लगेचच २८ ऑक्टोबर २०२२ रोजी, शुक्रवारी, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह बोरिवली (प) येते रात्री ८.३० वाजता हि मैफिल रंगेल. या मैफिलीचा आस्वाद घेण्यासाठी आपण bookmyshow वरून ऑनलाईन बुकिंग करू शकता किंवा फोन बुकिंगसाठी ९९८७८२०८०५ या क्रमांकावर संपर्क करा. ठाणे आणि बोरिवली नाट्यगृहावरील तिकीटविक्री २२ ऑक्टोबर २०२२, शनिवारपासून सुरु होईल. रसिक श्रोत्यांनी लवकरात लवकर आपली तिकिटे आरक्षित करावीत आणि शांताबाईंच्या अजरामर गाण्यांचा मनमुराद आनंद घ्यावा.

कवयित्री, गीतकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या शांता शेळके म्हणजे मराठी चित्रसृष्टीला पडलेलं एक गोड स्वप्न आहे. त्यांनी बालसाहित्य, चित्रपटगीते, समीक्षा लेखन, आत्मकथन, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांसोबत वृतपत्र संपादक आणि अध्यापक म्हणूनही यशस्वीरित्या काम केले.शांताबाईंनी हिंदी, इंग्रजी, संस्कृत, जपानी या भाषांमधील साहित्याचे अत्यंत ओघवत्या शैलीत मराठी भाषांतर केलेले आहे. त्यातील अत्यंत गाजलेले भाषांतर म्हणजे जपानी हायकुंचे. जपान मधील हा काव्यप्रकार त्यांनी अनुवादित करून मराठी रसिकांच्या पुढे ‘पाण्यावरच्या पाकळ्या’ नावाने ठेवला आणि तो लोकांना इतका आपला वाटला की लोक आता मराठी हायकू असंच म्हणतात.

संतांचे अभंग, ओव्या, तसेच पारंपरिक स्त्री गीते, लोकगीते इत्यादींचे संस्कार त्यांच्या कवितेतून प्रत्ययास आले. युगुलगीते, भावगीते, भक्तिगीते, स्फुर्तीगीते, लावण्या, कोळीगीते असे विविध संगीताचे प्रकार त्यांनी यशस्वीपणे हाताळले आहेत. अश्या या प्रतिभावान कवयित्री, गीतकार शांता शेळके यांचं हे जन्मशताब्दी वर्ष (१२ ऑक्टोबर १९२२ – १२ ऑक्टोबर २०२२) साजरे करण्यायोग्य आहे. म्हणूनच या निमित्तानेच त्यांच्या काही निवडक गाण्यांचा कार्यक्रम करण्याचे ‘अमिथी’ संस्थेने योजिले आणि आज ‘शंभरीच्या शांताबाई’ या नावाने हि सुरेल मैफिल कित्येक रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करताना दिसत आहे.