महाबळेश्वरातील बंगल्यामुळे शंभूराज देसाई अडचणीत : मंत्रीपद जाणार की राहणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
नागपूर येथे सुरू असलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारविरोधात महाविकास आघाडी चांगलीच आक्रमक झाली आहे. विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एनआयटी भूखंड विक्री प्रकरणी आरोप करण्यात आला. आतापर्यंत शिंदे-फडणवीस सरकारमधील 5 मंत्र्यांवर आरोप करण्यात आले आहेत. अब्दुल सत्तार, संजय राठोड यांच्यानंतर आता सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई अडचणीत येण्याची शक्यता आहे. शंभूराज देसाई यांनी बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. त्यामुळे आता मंत्रीपद जाणार की राहणार यांची आता चर्चा सुरू झाली आहे.

महाबळेश्वर जवळील नावली येथील गट क्रमांक- 24 मधील शेत जमिनीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अवैध बांधकाम केले असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या निवडणूक शपथपत्रात सदर जागेवर घराचे बांधकाम असल्याचा उल्लेख केला आहे. मात्र, मात्र सातबारा उताऱ्यावर घराच्या बांधकामाचा उल्लेख नाही. कोणतीही परवानगी न घेता घराचे अवैध बांधकाम केल्याचा आरोप ठाकरे गटाने शंभूराज देसाई यांच्यावर केला आहे.

निवडणूक शपथपत्रात या जमिनीचा शेतजमीन म्हणून उल्लेख आहे, परंतु प्रत्यक्षात या जमिनीवर निवासी बांधकाम केलेले आहे. सदरील जमीन ही इकोसेन्सेटिव्ह झोन मध्ये येत असल्यामुळे बांधकामास परवानगी नाही, ही बाब ठाकरे गटाने समोर आणली आहे. विशेष म्हणजे ही जमीन ही स्वतः शंभूराज देसाई यांच्या नावावर आहे. स्वतः लोकप्रतिनिधी असल्याने त्यांनीच अतिक्रमण तथा अवैध बांधकाम केल्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे. त्यामुळे आता शंभूराज देसाई यांचे मंत्रीपद जावून आमदारकी रद्द ठरू शकते. याकडे सातारा जिल्ह्यासह राज्यातील जनतेचे लक्ष्य लागून आहे.

नावली येथे बंगल्याचे बांधकाम 6 ते 7 वर्षापूर्वीचे
हिवाळी अधिवेशनात वादात सापडलेला मंत्री शंभूराज देसाई यांच्या बंगल्याची माहिती थेट घटनास्थळावरून घेण्यात आली आहे. नावली येथे शंभुराज देसाई यांनी 10 वर्षांपुर्वी जागा खरेदी केल्याचं सांगण्यात येत आहे.तसेच या जागेवरील बंगला सुमारे 6 ते 7 वर्षांपुर्वी बांधल्याची प्राथमीक माहिती भालगेवाडीच्या ग्रामस्थांनी सांगितलीय.