हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Shambhuraj Desai On Patharpunj। देशातील सर्वाधिक पावसाची नोंद ज्याठिकाणी झाली ते सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पाथरपुंज गाव पर्यटनाच्या दृष्टीने जागतिक नकाशावर आणण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहेत अशी प्रतिक्रिया राज्याचे पर्यटनमंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाथरपुंज गाव जरी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत असले तरी पर्यटनाच्या दृष्टीने याठिकाणी पर्यटक कसे आकर्षित होतील यासाठीचे माझे पर्यंत सुरु आहेत. मी यासंदर्भात एक – दोन बैठकाही घेतल्याचे मंत्री देसाई यांनी “हॅलो महाराष्ट्र” शी बोलताना सांगितले.
काय म्हणाले शंभुराज देसाई ? Shambhuraj Desai On Patharpunj
आज पाथरपुंजचा विचार जर केला तर पाथरपुंजमध्ये पिढ्यानपिढ्या अनेक वर्ष रहिवास करणारी कुटुंबे त्याठिकाणी आहेत. काही लोक नोकरीनिमित्त साताऱ्याला आली,काहीजण मुंबई आणि पुण्याला गेली. वर्षातून एकदा – दोनदा हि लोक मूळगावी म्हणजेच पाथरपुंजला येत असतात. परंतु जेव्हा मी पर्यटन विभागाचा मंत्री झालो तेव्हा माझी एक कल्पना होती कि, जर देशातील सर्वाधिक पाऊस हा पाथरपुंजला होतो, जरी तो व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत असला तरी पर्यटनाच्या दृष्टीने पर्यटक कसे आकर्षित होतील यासाठीचे माझे पर्यंत सुरु आहेत….
पाथरपुंज हे गाव अजून बऱ्याच लोकांना माहित नाही… अशावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वेबसाईटवर, पर्यटन संचालनाच्या वेबसाईटवर, अगदी देशाचे जे पर्यटन विभाग आहे त्यांच्याशीही लिंकिंग करून पाथरपुंज हे गाव जागतिक नकाशावर आणण्याचे माझे प्रयत्न सुरु आहेत. यासंदर्भात मी एक- दोन वेळा प्राथमिक बैठकाही घेतल्या होत्या. आता ऑक्टोबरच्या महिन्यात माझ्या पर्यटन विभागाच्या बैठका होणार आहेत. या बैठकीत आम्ही पाथरपुंजच्या पर्यटनाबाबत नियोजन ठरवेन. Shambhuraj Desai On Patharpunj
शंभूराज देसाई पुढे म्हणाले, पाथरपुंजला जायला रस्ता आहे, परंतु तो कच्चा रस्ता आहे. बऱ्याच वेळा तिथे चारचाकी घेऊन जाताना व्याघ्र प्रकल्प अभयारण्यामुळे काही निर्बंध आहेत. पण इकोफ्रेंडली गाड्या घेऊन लोकांच्या त्याठिकाणी पाहणी करता येईल का? यादृष्टीने आराखडा बनवायच्या सूचना मी वनविभागाला आणि आमच्या पर्यटनाला दिल्या आहेत. पाथरपुंजला विशेषतः जून, जुलै ते १५ ऑगस्ट या दरम्यान पाऊस पडतो. या अडीच महिन्यात लोकांना पाथरपुंजला जाता येईल, तिथला पाऊस अनुभवता येईल, तेथील निसर्ग पाहता येईल आणि तिथली जी खाद्यसंस्कृती आहे तिचा अनुभव घेता येईल,.. वनडे ट्रिप ज्याला आपण म्हणतो म्हणजे सकाळी लवकर लोक पाथरपुंजला गेली आणि संध्याकाळी रिटर्न आली तरी हे एक चांगलं पर्यटन ठिकाण म्हणून पाथरपुंज उदयास येईल. त्यादृष्टीने माझे प्रयत्न सुरू आहेत.
येत्या महिन्यात किंवा २ महिन्यात आमचं प्राथमिक प्रारूप तयार होईल आणि पर्यटनाच्या बाबतीत अशी ठिकाणे जागतिक नकाशावर आणावीत यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही असतात, साताऱ्याचे सुपुत्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबही आग्रही असतात. त्यामुळे आमचं वनविभाग आणि पर्यटन विभाग एकत्रितपणे याच प्रारूप तयार करणार आहोत ते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांना दाखवू…. यांच्यात आणखी काही सुधारणा असतील तर त्या सुद्धा करू. तसेच निधी कसा उपलब्ध करायचा? व्याघ्र प्रकल्प आणि वन विभाग याच्या नियमांना कुठेही अडथळा न येता निसर्ग कसा पाहता येईल याचा विचार करू. पाथरपुंजला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणण्याचा आमच्या प्रयत्न सुरु आहे असं शंभूराज देसाई यांनी सांगितलं.
यंदा पाथरपुंजला किती पाऊस पडला?
दरम्यान, यावर्षी १ जून ते १ सप्टेंबर या कालावधीत पाथरपुंजमध्ये (Patharpunj ) तब्बल ६८१३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. याच दरम्यान, मेघालयातील चेरापुंजी येथे (१ जानेवारी ते ३१ ऑगस्ट) ६२७९.५० मिमी पाऊस झाला आहे. फक्त मान्सूनच्या काळाचा विचार केल्यास (१ जून ते ३१ ऑगस्ट) पाथरपुंजमध्ये ६८१३ मिमी, तर चेरापुंजीमध्ये ३९७५.१० मिमी पाऊस नोंदवला गेला आहे, ज्यातून दोघांमधील तफावत खूप मोठ्या प्रमाणावर आढळून येते




