पश्चिम महाराष्ट्रातील ‘हा’ मंत्री राजीनामा देणार; महायुतीला मोठा धक्का

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनीही मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची भाषा वापरली आहे. शंभूराज देसाई हे एकनाथ शिंदे यांच्या गटातील असून सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत. मात्र सातारा लोकसभा निवडणुकीत पाटण या आपल्या हक्काच्या मतदारसंघातून उदयनराजे भोसले याना लीड न मिळाल्याने शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) नाराज आहेत. उदयनराजे भोसले हे जरी विजयी झाले असले तरी पाटण मध्ये त्यांना मिळालेल्या कमी मतदानाबद्दल मीच जबाबदार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मी अपेक्षाभंग केला आहे. यामुळे मला मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करणार असल्याचे शंभूराज देसाई म्हणाले.

शनिवारी आयोजित केलेल्या शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, लोकसभा निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले उभे नसून शंभूराज देसाई उभे राहिले आहेत. त्यामुळे शिवसेना व देसाई गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मताधिक्य देवून विजयी करावे, असा प्रचार करुनसुध्दा उदयनराजेंना मताधिक्य मिळाले नाही. उदयनराजे भोसले विजयी झाले असले तरी घटलेल्या मताधिक्यामुळे माझाच पराभव झाला आहे. मंत्रिपदामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या डोक्यात सत्ता गेली. त्यांना सुस्ती आल्यामुळे घटलेले मताधिक्य ही माझी जबाबदारी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मी अपेक्षाभंग केला आहे. यामुळे मला मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करणार आहे.

उदयनराजे या निवडणुकीत विजयी झाले असले तरी शंभूराज देसाई यांचा पराभव झाला आहे. मी खुर्चीला चिटकून बसणारा कार्यकर्ता नाही. तालुक्यातील जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या हितासाठी सत्ता मिळवली. ती सत्ता जनतेला व कार्यकर्त्याना टिकवता आली नाही. यापुढील काळात मी संघटनेसाठी काम करणार आहे. लवकरच आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून मला मंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे. मी आमदार म्हणून संघटनेसाठी काम करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे. मुख्यमंत्र्यांचा माझ्यावर विश्वास होता, मात्र तो सार्थ करू शकलो नाही, अशी खंत शंभूराज देसाईंनी बोलून दाखवली.