ईडीचा वापर करून सरकारचा दहशत पसरवण्याचा प्रयत्न; शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना ईडीची नोटीस आली आहे. या नोटीशीमध्ये रोहित पवारांना 24 जानेवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्य म्हणजे, रोहित पवारांवर झालेल्या कारवाईनंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) केंद्र सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. सोलापूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना, “ईडीचा वापर केंद्र सरकार हत्यार म्हणून करत आहे” अशी टीका शरद पवारांनी केली आहे.

शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर असताना शरद पवारांनी मोदींवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, “मोदी सोलापुरात येऊन नगर गृहप्रकल्पाचे उदघाटन करून गेले, व्यासपीठावर थांबून मोदींना अश्रू अनावर झाले. लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. सोलापुरात अनेक लोक आजही बेरोजगार आहेत. महागाई जबरदस्त वाढली आहे या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काही बोलले नाहीत”

त्याचबरोबर रोहित पवारांना आलेल्या ईडीच्या नोटीशीवर प्रतिक्रिया देताना, “केंद्रीय संस्था ईडीचा वापर सरकार हत्यार म्हणून करत आहे. एकच सरकार सत्तेत असल्याने ईडीचा वापर करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. अनिल देशमुख यांना सहा महिने तुरुंगात पाठवले, सामनाचे संपादक संजय राऊत यांनाही तुरुंगात टाकले, याचाच अर्थ सरकार ईडीचा वापर सरकार हत्यार म्हणून करत आहे” अशा शब्दात शरद पवारांनी टीका केली आहे.

दरम्यान, शुक्रवारी आमदार रोहित पवार यांना ईडीने नोटीस बजावली आहे. ईडीने रोहित पवार यांना 24 जानेवारीला चौकशीसाठी बोलावले आहे. या अगोदर केंद्रीय यंत्रणांकडून रोहित पवारांना वेगवेगळ्या कारणांसाठी नोटीस बनवण्यात आली होती. तसेच बारामती ॲग्रोशी संबंधित कारखान्यांवर ईडीने छापे टाकले होते.