Wednesday, February 8, 2023

मराठा आरक्षणाचा आवाज हरपला, मेटे यांचे निधन वेदनादायी : शरद पवार

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे खोपली येथील बातम बोगद्याजवळ आज पहाटे साडेपाचच्या सुमारास झालेल्या अपघातात निधन झाले. अपघातानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रुग्णालयात जाऊन मेटे यांच्या नातेवाईकांची भेट घेतली व मेटे यांना श्रद्धांजली वाहिली. “विनायक मेटे यांचे निधन वेदनादायी आहे. गेली अनेक वर्ष मेटे यांनी महाराष्ट्रासाठी मोलाची कामगिरी केली. ते मराठा आरक्षण प्रश्नावर कायम आवाज उठवायचे. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असे पवार यांनी म्हटले.

शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सकाळी उठवल्यानंतर पहिलीच बातमी मेटेंच्या निधनाची ऐकायला मिळाली. धक्का बसला, मेटे यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. मेटे यांनी मराठा समाजासाठी उल्लेखनीय काम केले. सामाजिक प्रश्नाची मांडणी शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याच्याकडून केली जायची.

पहाटेच्या सुमारास अपघात –

- Advertisement -

पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर विनायक मेटे यांचा आज पहाटे साडेपाच वाजता खोपोली परिसरातील बातम बोगद्याजवळ अपघात झाला. अपघातानंतर त्यांना पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्राणज्योत मालावली. आज मराठा समन्वय समितीची दुपारी बैठक होती. या बैठकीसाठी मेटे मुंबईकडे निघाले होते. मुंबईकडे येत असताना त्यांचा अपघात झाला. या अपघातात मेटे यांना गंभीर दुखापत झाली. यातच त्यांचा मृत्यू झाला.