Sharad Pawar : साहेब, निवृत्तीचा निर्णय मागे घ्या; पुण्यात झळकले विनंती करणारे बॅनर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लोक माझे सांगाती या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण राजकारणात निवृत्ती घेतोय अस म्हणत सर्वानाच मोठा धक्का दिला. यानंतर तेथील उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच बडे नेतेमंडळी आणि युवक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पवारांना आपला हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. तब्बल 2 तास नेते पवारांसमोर ठाण मांडून बसले होते. मात्र पवार आपल्या निर्णयावर ठाम राहिले. या सर्व घडामोडींनंतर पुण्यात शरद पवार यांना विनंती करणारा बॅनर झळकला आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष समीर उत्तरकर यांनी हे बॅनर लावलं आहे. साहेब निवृत्त पदाधिकारी होत असतात जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे जनतेच्या मनातील राजे नव्हे”, असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आला आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर अवघ्या देशाला आपल्या नेतृत्वाची गरज आहे साहेब, कृपया आपल्या निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

दरम्यान, काल शरद पवार यांनी अचानकपणे निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये मोठी खळबळ उडाली. जेष्ठ नेते जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांना पवारांसमोर अश्रू अनावर झाले. कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा अक्षरशः बांध फुटला. ‘‘साहेब… आम्हाला तुम्हीच हवे आहात, निर्णय मागे घ्या,’’ अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर दणाणून सोडले होते. या संपूर्ण घडामोडींनंतर नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन ‘फेरविचारासाठी दोन दिवस द्या,’ असे शरद पवारांनी सांगितले. त्यामुळे पवार आपला निर्णय बदलणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य लागले आहे.