शरद पवारांचे जरांगे पाटलांच्या उपोषणाला समर्थन; म्हणाले…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत. तर राज्यभरात देखील मराठा बांधवांकडून साखळी आंदोलन पुकारण्यात आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे. तसेच, “मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला वेळ दिला पण त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. सरकारने त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे, उपोषण करणाऱ्यांना दोष देता येणार नाही” असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

आज पार पडलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन दाखवले आहे. त्याचबरोबर, “सरकारने मनोज जरांगेंना दिलेल्या वेळेत आरक्षणावर निर्णय घेऊ, असं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र, ते आश्वासन पूर्ण झालेलं दिसत नाही. जे करणं शक्य नाही त्याचा शब्द कधी देऊ नये. त्यामुळे आता उपोषण करणाऱ्यांना दोष देता येणार नाही” असे शरद पवारांनी म्हणले आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे शरद पवारांचा जरांगे पाटलांना पुर्ण पाठिंबा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, गुरुवारी जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रोहित पवार यांनी देखील एक दिवस अन्नत्याग आंदोलन केले. तसेच, “एक सामाजिक कार्यकर्ता जर उपोषण करत असेल तर सरकारने पुढाकार घ्यावा. जर तुम्ही घटना दुरूस्ती करू शकता तर मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण का देऊ शकत नाही? या समाजाला कोर्टात टिकणार आरक्षण द्यायला पाहिजे” असे रोहित पवारांनी म्हणले. त्यानंतर आज शरद पवारांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे.