त्या एका कामासाठी गौतम अदानींनी केली तब्बल 25 कोटींची मदत; शरद पवारांनी मानले आभार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बारामतीमध्ये उभारण्यात येणाऱ्या नव्या टेक्नॉलॉजी सेंटरच्या निर्मितीसाठी उद्योगपती गौतम अदानी यांनी 25 कोटींची मदत केली आहे, असा खुलासा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथील गदिमा सभागृहात पार पडलेल्या एका कार्यक्रमात बोलताना मदतीचा किस्सा सांगत शरद पवार यांनी गौतम अदानी यांचे आभार मानले.

बारामतीत झालेल्या कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले की, आपण भारतात आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचं पहिलं केंद्र तयार करत आहोत. त्याच्या उभारण्याचे काम देखील सध्या सुरू आहे. उभारण्यात येणाऱ्या या सेंटरसाठी अदानी यांनी 25 कोटी रुपयांचा धनादेश दिला आहे. त्यांचं नाव याठिकाणी मला घेतलं पाहिजे. कारण, आपल्याला सेंटर उभारण्यासाठी 25 कोटी रुपयांची आवश्यकता होती. ती मदत गौतम अदानी यांनी केली आहे.

त्याचबरोबर, फर्स्ट सिफोटेक कंपनीने या प्रकल्पासाठी 10 कोटी रुपये दिले. त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार. या दोघांच्या मदतीमुळे आज आपण या ठिकाणी दोन्ही प्रकल्प उभारत आहोत. त्यासाठीचं काम सुरू झाले आहे. 17 ते 22 जानेवारी या कालावधीत कृषी विकास प्रतिष्ठानच्या सहकार्यानं बारामतीत एका कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येत आहे. त्यात लाखो शेतकरी सहभागी होतील” अशा शब्दात शरद पवार यांनी प्रकल्पासाठी मदत करणाऱ्यांचे आभार मानले.

दरम्यान, एकीकडे इंडिया आघाडी, काँग्रेस पक्ष आणि इतर काही पक्ष गौतम अदानी यांच्यावर जोरदार टीका करत असताना दुसरीकडे शरद पवार यांनी गौतम अदानी यांचे कौतुक केले आहे. त्यामुळे सध्या शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांच्या भोळ्या उंचावल्या गेल्या आहेत.