सरकारला शेतकऱ्यांबद्दल आस्था राहिलेली नाही.., रास्ता रोको आंदोलनातून शरद पवारांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| कांदा निर्यात बंदीच्या मुद्द्यावरून राज्यातील शेतकऱ्यांनी आक्रमकाची भूमिका घेतली आहे. आज याच मुद्द्याला धरून शरद पवार यांनीही केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. “सरकारला शेतकऱ्यांबद्दल आस्था राहिलेली नाही, सरकारला शेतकऱ्यांच्या कष्टाचीही किंमत नाही” अशी टीका शरद पवार यांनी केली आहे. आज शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

कांदा निर्यात बंदीच्या मुद्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, “सरकारला शेतकऱ्यांबद्दल आस्था राहिलेली नाही. शेतकरी हवालदिल झाले आहेत. आपण रस्तारोको आंदोलन करतोय याने लोकांना त्रास होतो. पण आता रस्त्यावर उतरल्याशिवाय केंद्र सरकारला कळत नाही. आंदोलनानंतर दिल्लीश्वरांना कांद्याची निर्यातबंदी उठवावीच लागणार आहे”

त्याचबरोबर, “नाशिक जिल्हा देशात शेतीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. घाम गाळून काळ्या आईशी इमान राखण्याची भूमिका तुम्ही घेतली. देशाच्या नकाशावर नाशिकच्या शेतकऱ्यांची नोंद झाली आहे. कांद्याच्या संदर्भात केंद्राने निर्णय घेतल्यावर मी अधिकाऱ्यांची बैठक घेतली” असे ही शरद पवारांनी म्हणले.

दरम्यान, राज्यात कांदा निर्यात बंदीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. अशातच कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले आहेत. आज याचं पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबई- आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये शरद पवारांनी सहभाग नोंदवत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. तसेच, केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठलीच पाहिजे, असा इशारा देखील दिला.