शरद पवार विरोधकांचा प्रमुख चेहरा? नितीशकुमारांचे महत्त्वाचे संकेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे विरोधकांचे प्रमुख चेहरा झाले तर आपल्याला आनंदच होईल असं मोठं विधान बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केलं आहे. नितीशकुमार महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी सिल्वर ओक वर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी आयोजित केलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

नितीशकुमार म्हणाले, शरद पवार विरोधकांचा प्रमुख चेहरा झाल्यास आम्हाला आनंदच आहे. आम्ही त्यांना सांगितलं आहे, तुम्हाला मजबुतीने सगळं करावं लागेल, फक्त पक्षासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी त्यांना काम करावं लागेल असं नितीशकुमार म्हणाले. भाजप जे काही करत आहे ते देशाच्या हिताचे नाही. त्यामुळे विरोधी पक्ष जितके जास्त एकत्र येतील तितके चांगले आहे. देशाच्या हितासाठी आम्ही अनेक राजकीय पक्षांशी बोललो आहोत. आम्ही एकत्र बसून पुढील निर्णय घेऊ असेही नितीशकुमार यांनी म्हंटल.

यावेळी शरद पवार यांनीही आपलं मत व्यक्त करताना म्हंटल की, देशातील परिस्थिती पाहता लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र काम करणे महत्त्वाचे आहे. देशाची स्थिती पाहिल्यानंतर ते असे दिसते की आपण एकत्र काम केले तर देशाला आवश्यक असलेल्या पर्यायाला पाठिंबा मिळेल. त्यासाठी आपल्याला एकत्र काम करायचे आहे, विरोधकांचा चेहरा कोण असेल ते नंतर ठरवू असं शरद पवारांनी म्हंटल.