पवारांचा वजीर 40 आमदारांसह गायब होणारच; आमदाराच्या दाव्याने खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
राष्ट्र्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेत असल्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शरद पवार यांच्या या धक्कातंत्राने राष्ट्रवादी मध्येही खळबळ उडाली असून पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी विनंती नेते करत आहेत. एकीकडे हे सगळं सुरु असताना दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी मात्र मोठा दावा केला आहे. शरद पवारांचा वजीर काहीही केलं तरी ४० आमदारांना घेवुन गायब होणारच आहे असं त्यांनी म्हंटल आहे. ते सातारा येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

शरद पवार हुशार आहेत, त्यांना कळलं होते की त्यांचा वजीर निघून चालला आहे. ४० आमदारांना घेवुन त्यांचा वजीर गायब होणार होता, त्यामुळे पक्ष टिकवण्यासाठी अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला.परंतु थोड्या दिवसानी त्यांचा वजीर गायब होणारच आहे. असं महेश शिंदे यांनी म्हंटल. अक्खा राष्ट्रवादी पक्षच नामशेष होण्याच्या मार्गावर चालला होता. एका घरात २ मुख्यमंत्री कसा होणार असा सवालही त्यांनी केला.

दरम्यान, सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा पुढे ढकलण्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यावरूनही महेश शिंदे यांनी टोला लगावला आहे. मुळात वज्रमूठ होतीच कुठे? वज्रमूठ करायला अंगात ताकद लागते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळंच गायब केलं आहे त्यामुळे वज्रही नाही आणि मूठही नाही असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीची खिल्ली उडवली आहे.