“राहुल गांधी मूळचे गांधी नसून खान आहेत”, शरद पोंक्षेंचं खळबळजनक वक्तव्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठी कलाकार शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) सध्या आपल्या खळबळजनक वक्तव्यांमुळे चर्चेचा भाग बनले आहेत. आता त्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात थेट काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नाशिक येथील मालेगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना, “राहुल गांधी मूळचे गांधी नसून खान आहेत” असा दावा शरद पोंक्षे यांनी केला आहे.  “एक तर तू गांधी नाही अन् सावरकर पण नाही, हे काही ओरिजनल गांधी नसून तर खान आहे. हे महात्मा गांधीचे वंशज नसून त्यांच्या आडनावाचा फायदा घेत आहेत” अशी टीका पोंक्षे यांनी राहुल गांधींवर केली आहे.

काल स्वातंत्र्यदिनानिमित्त मालेगाव येथे विचार मंच तर्फे प्रबोधन आणि वीर सावरकरांच्या जीवनावर आधारित एका व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेला प्रमुख पाहुणे म्हणून शरद पोंक्षे यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळेस बोलताना त्यांनी गांधी घराण्यावर जोरदार टीका केली. तसेच, “एक तर तू गांधी नाही अन् सावरकर पण नाही. हे काही ओरिजनल गांधी नसून तर खान आहेत. महात्मा गांधीचे वंशज नाही, तर त्यांच्या आडनावाचा फायदा यांनी घेतला, फिरोज खान यांची पुढची ही पिलावळ आहे. या मुर्खांना यांच्या आजीचा इतिहास माहीत नाही तर यांना सावरकरांचा कसा माहित असणार? अशी जोरदार टीका पोंक्षे यांनी केली.

त्याचबरोबर, “राफेल प्रकरणात सुद्धा त्यांनी सुप्रिम कोर्टात माफी मागितली. जोपर्यंत अपिल करण्याची संधी आहे, तोपर्यंत हे कोर्टात माफी मागत असतात. सावरकर प्रकरणात हेच झाले” असे पोंक्षे यांनी म्हणले. दरम्यान, सध्या ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे शरद पोंक्षे यांचे नाटक जोरदार गाजत आहे. तर दुसऱ्या बाजूला याच नाटकामुळे त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. असे असले तरी शरद पोंक्षे यांनी या नाटकाचे पुढील प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकताच त्यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून, आपण ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक पुन्हा प्रदर्शित करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या नाटकाला लोकांकडून कसा प्रतिसाद मिळेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.