हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IPL 2025 च्या ७ व्या सामन्यात, लखनौ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादचा ५ गडी राखून पराभव केला. लखनौच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) …. शार्दूलने आपल्या ४ ओव्हर मध्ये ३४ धावा देऊन ४ बळी घेतले. त्याच्या या देदीप्यमान कामगिरीने त्याला पुरस्काराने गौरवण्यात आलं. सध्या जास्त विकेट घेतल्यास मिळणारी पर्पल कॅप सुद्धा शार्दूल ठाकूरच्याच डोक्यावर आहे. परंतु तुम्हाला माहितेय का? आयपीएल लिलावात शार्दूल ठाकूर Unsold राहिला होता, त्याला कोणत्याच संघाने खरेदी केलं नव्हतं. मात्र झहीर खानचा एक कॉल आला आणि सगळं काही बदललं असा खुलासा शार्दूल ठाकूरने केला आहे. नेमकं घडलं तरी काय? शार्दूल लखनौच्या ताफ्यात कसा सामील झाला त्याचीच ही इन्साईड स्टोरी…..
कालच्या सामन्यात सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आल्यानंतर शार्दुलला विचारण्यात आले की लिलावात न विकल्या गेल्यानंतर तो या हंगामात आयपीएलमध्ये खेळेल असे त्याला वाटते का? यावर उत्तर देताना शार्दुल म्हणाला, खरं सांगायचं तर नाही…. पण मी माझ्या योजना आखल्या होत्या. जर माझी आयपीएलमध्ये निवड झाली नाही, तर मी काउंटी क्रिकेट खेळण्याचाही विचार करत होतो. मात्र जेव्हा मी रणजी ट्रॉफीमध्ये खेळत होतो, तेव्हा झहीर खानने (Zaheer Khan) मला फोन केला आणि त्यांनी मला सांगितले की तुला संभाव्य बदली म्हणून बोलावले जाऊ शकते. जर तुला बदली खेळाडू म्हणून बोलावले गेले तर तुला पुन्हा सुरुवात करावी लागेल. मी सुद्धा यावर विचार केला आणि चान्स घेतला.
शार्दुल पुढे म्हणाला, चढ-उतार हे आयुष्याचा एक भाग आहेत. मी नेहमीच माझ्या कौशल्यांचे समर्थन केले आहे. हेड आणि अभिषेक यांना बॅटिंग करताना रिस्क घेणं आवडत, त्यामुळे मी विचार केला की मी देखील माझे चान्स घेईन. नवीन चेंडू स्विंग झाला तर तुम्ही विकेट घेऊ शकता आणि मी तशीच बॉलिंग केली. खरं तर अशा सामन्यांमध्ये गोलंदाजांना खूप कमी संधी मिळतात. मी याच्या आधीही बोललो होतो कि, की खेळपट्ट्या अशा प्रकारे तयार केल्या पाहिजेत की खेळ संतुलित राहील.
दरम्यान, सनरायजर्स हैद्राबाद विरुद्धच्या सामन्यात शार्दूल ठाकूरने तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर अभिषेक शर्मा आणि दुसऱ्या चेंडूवर इशान किशनची विकेट घेतली. अभिषेक शर्माने फक्त ६ धावा केल्या तर गेल्या सामन्यात शतक झळकावणारा इशान आपले खातेही उघडू शकला नाही. यानंतर शार्दुलने अभिनव मनोहर आणि मोहम्मद शमीला आऊट करत तब्बल ४ बळी घेतले.