हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेअर बाजारात आता मोठे चढ उतार सुरु आहेत. बाजारातील अस्थिरतेच्या वातावरणामुळे टाटा ग्रुपच्या रिटेल कंपनी ट्रेंटचे शेअर्स 18% पेक्षा जास्त घसरणीला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे कंपनीचे शेअर्स 4525 रुपये प्रति शेअरच्या पातळीवर जाऊन पोहोचले आहेत. मार्च 2025 तिमाहीसाठी ट्रेंटने केलेल्या व्यवसायात चौथ्या तिमाहीत कंपनीचा स्टॅंडअलोन महसूल 28.2% वाढून 4,334 कोटी रुपये झाला आहे. मागील वर्षाच्या समान कालावधीत कंपनीचा स्टॅंडअलोन महसूल 3,381 कोटी रुपये होता. तसेच, कंपनीने मार्च 2025 तिमाहीदरम्यान 13 नवीन Westside स्टोअर्स आणि 132 नवीन Zudio आउटलेट्स उघडले असून, त्याचा प्रभाव कंपनीच्या रिटेल उपस्थितीवर दिसून आला आहे.
शेअर्समध्ये 35% च्या आसपास घसरण –
कंपनीच्या 2025 आर्थिक वर्षात स्टॅंडअलोन महसूल 39% वाढून 17,624 कोटी रुपये झाला आहे, जो 2024 मध्ये 12,669 कोटी रुपये होता. ट्रेंटच्या शेअर्समध्ये मागील 6 महिन्यांत 39% पेक्षा जास्त घसरण झाली आहे. 7 ऑक्टोबर 2024 रोजी शेअरचा भाव 7449.50 रुपये होता, जो 7 एप्रिल 2025 रोजी 4525 रुपये झाला आहे. यावर्षी आतापर्यंत ट्रेंटच्या शेअर्समध्ये 35% च्या आसपास घसरण झाली आहे.
शेअर बाजाराच्या चढ-उतारामुळे कंपनीच्या भविष्यातील दिशा –
दिग्गज गुंतवणूकदार राधाकिशन दमानीने ट्रेंटच्या शेअर्सवर मोठा डाव खेळला आहे. दमानीकडे ट्रेंटचे 45,07,407 शेअर्स आहेत, जे कंपनीतील 1.27% हिस्सेदारी दर्शवितात. हे शेअरहोल्डिंग डिसेंबर 2024 तिमाहीपर्यंतचे आहे. ट्रेंट कंपनीने व्यवसाय विस्ताराच्या दृष्टीने सकारात्मक वाटचाल केली असली, तरी शेअर बाजाराच्या चढ-उतारामुळे कंपनीच्या भविष्यातील दिशा अद्याप अस्पष्ट आहे.




