महेश शिंदेंनी दुसऱ्याचे भविष्य सांगण्यापेक्षा स्वत:च्या अस्तित्वाची काळजी करावी- शशिकांत शिंदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
शरद पवारांचा वजीर 40 आमदारांना घेवुन गायब होणारच आहे असं म्हणत शिंदेंच्या शिवसेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्यावर आज राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार शशिकांत शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. महेश शिंदेंनी दुसऱ्याचे भविष्य सांगण्यापेक्षा स्वत:च्या अस्तित्वाची काळजी करावी असा टोला त्यांनी लगावला तसेच जर अजित पवार भाजपात आले तर तुमचं काय होईल असा प्रतिसवाल सुद्धा शशिकांत शिंदे यांनी केलाय

सातारा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले, महेश शिंदे हे कधी पासुन भविष्य सांगायला लागले हे कळत नाही, खरं तर त्यांच्याच अस्तिस्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वोच्य न्यायालयात हे 16 आमदार अपात्र झाले तर महेश शिंदे यांचं अस्तित्व कुठे राहणार आहे, त्यामुळे महेश शिंदे यांनी आधी स्वत:च्या अस्तित्वाची काळजी करावी आणि मग बाकीच्या पक्षातील लोकांच्या अस्तित्वाची काळजी करावी असा पलटवार शशिकांत शिंदे यांनी केला. 15 तारखेच्या आत सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेल आणि हे अपात्र होतील त्यानंतर त्यांनी दुसऱ्याच्या अस्तित्वाचे भविष्य सांगावे असा टोलाही शशिकांत शिंदे यांनी लगावला. अजित पवार भाजपात आले तर तुमचं काय होईल असा प्रतिसवाल सुद्धा शिंदे यांनी केलाय

महेश शिंदे यांनी काय टीका केली होती?

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता. शरद पवार हुशार आहेत, त्यांना कळलं होते की त्यांचा वजीर निघून चालला आहे. 40 आमदारांना घेवुन त्यांचा वजीर गायब होणार होता, त्यामुळे पक्ष टिकवण्यासाठी अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला.परंतु थोड्या दिवसानी त्यांचा वजीर गायब होणारच आहे. असं महेश शिंदे यांनी म्हंटल होते. अक्खा राष्ट्रवादी पक्षच नामशेष होण्याच्या मार्गावर चालला होता अशी टीकाही त्यांनी केली होती.