शेंद्रे– कागल राष्ट्रीय महामार्ग लवकरच होणार 6 पदरीकरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
शेंद्रे ते कागल राष्ट्रीय महामार्ग NH- 4 चे सहा पदरीकरणाचे काम येत्या दोन वर्षात पूर्ण होणार असल्याची माहीती लोकसभेत खा. श्रीनिवास पाटील यानी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रस्ते वहातूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी दिले आहे. शेंद्रे ते कागल या राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण कामाचे भूमिपूजन नितिन गडकरी यांनी कराड येथे दि. 25 सप्टेंबर 2021 रोजी केले होते. जवळपास त्यास एक वर्ष पूर्ण झाले. तरी प्रत्यक्षात सहापदरीकरणाचे काम कधी होणार याबाबत प्रवासी व नागरिकांमध्ये उत्सुकता होती. लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात खा. श्रीनिवास पाटील यांनी यासंदर्भात अतारांकित प्रश्नाद्वारे सरकारचे लक्ष वेधले.

खा.श्रीनिवास पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग NH- 4 वरील शेंद्रे ते कागल या कामाची सध्याची स्थिती काय आहे? सर्व आवश्यक परवानग्या, भूसंपादन प्रक्रिया, करारनामे पूर्ण झाले आहेत का? आणि असल्यास त्याचा तपशील आणि सदर प्रकल्प सुरू आणि पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा निश्चित केली आहे का? असा अतारांकित प्रश्न विचारला होता. त्यास मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर देताना भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने दोन पॅकेजेसमध्ये कागल-सातारा विभागाच्या 592. 240 किमी ते राष्ट्रीय महामार्ग एनएचएआय 4 च्या 725.00  किमी पर्यंत सहा पदरीकरणाचे काम हाती घेतले असल्याचे नमूद केले. दि. 26 ऑगस्ट 2022 रोजी 592.240 किमी ते 658.000 किमी पर्यंतचे पॅकेज- I (कागल ते पेठनाका) आणि एनएच 4 च्या किमी 658. 000 ते किमी 725. 000 पर्यंतचे पॅकेज- II (पेठनाका ते शेंद्रे) दि. 30 मार्च 2022 रोजी प्रदान करण्यात आले आहे.

करारामध्ये नमूद केलेल्या वेळेनुसार कागल ते पेठनाका पर्यंतचे काम जानेवारी 2023 मध्ये सुरू करण्याचे आणि जानेवारी 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. पेठनाका ते शेंद्रे पर्यंतचे काम सुरू करण्यात आले आहे. ते डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष आहे असे ना.नितीन गडकरी यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे.