लोकसभेच्या 22 जागांवर शिंदे गटाचा दावा; महायुतीत जागावाटप ठरणार कळीचा मुद्दा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात आगामी निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून एक मोठा दावा करण्यात आला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने युतीत लढवलेल्या 22 जागांवर शिंदे गटाने दावा केला आहे. त्यामुळे यावेळी या सर्व 22 जागा लढविण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू करण्यात आली आहे. मात्र या दाव्यामुळे महायुतीतील जागावाटप हा कळीचा मुद्दा निर्माण झाला आहे.

सध्या शिंदे गटाकडून शिवसेनेच्या वाटय़ाला आलेल्या सर्व 22 जागा लढवण्यासाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी निवडणूकांची रणनीती, प्रचार आणि प्रलंबित राहिलेले प्रश्न यावर खासदारांशी चर्चा केली. यानंतरच, “लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत. लोकसभेच्या २२ मतदारसंघांत शिवसेनेचा खासदार निवडून कसा येईल, यावर भर दिला जाणार आहे. विद्यमान 13  खासदारांचा निर्णय झाला आहे. उर्वरित ठिकाणी उमेदवारीबाबत भाजप आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील. ” असे राहुल शेवाळे यांच्याकडून सांगण्यात आले.

दरम्यान, आता शिंदे गटाकडून 22 जागांसाठी दावा करण्यात आला असला तरी शिवसेनेचे 13 पैकी खासदार हे शिंदे गटाबरोबरच आहेत आणि तेवढ्याच 13 जागा शिंदे गटाला सोडण्याची योजना भाजपने आखली आहे. शिंदे गटाबरोबर आता भाजपसोबत अजित पवार गट असल्यामुळे देखील या गटासाठी भाजपला जागा सोडाव्या लागणार आहेत. यामुळे शिंदे गटाने केलेली अतिरिक्त जागांची मागणी भाजपला अडचणीत आणू शकते.

मुख्य म्हणजे, लोकसभेच्या 22 जागांवर शिंदे गट आडून राहिल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला किती जागा मिळतील असा देखील प्रश्न निर्माण होणार आहे. सध्या भाजपाचे 23 खासदार असले तरी यामध्ये अजित पवार गटाकडून फक्त सुनील तटकरे हे एकमेव खासदार आहेत. या कारणामुळे अजित पवार गट 6 ते 7 जागा हव्या असल्याची मागणी करताना दिसत आहे. मात्र आता या सर्व घडामोडीमुळे शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.