चिन्ह मिळालं आता शिंदे गटाला केंद्रीय मंत्रिमंडळात मिळणार 4 मंत्रिपदे?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल केंद्रीय निवडणूक आयोगाने महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक असा निकाल दिला. या निकालात शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला आयोगाने दिले. त्यामुळे ठाकरेशिवाय आता शिवसेना असणार आहे. या निर्णयानंतर मोदी सरकारमध्ये शिंदे गटाला स्थान मिळण्याची शक्यता आहे. जवळपास चार जणांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार प्रलंबित आहे. दरम्यान आता थेट केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून शिंदे गटातील काही इच्छुक खासदारांना मंत्रीपदाची ऑफर मिळणार आहे. त्यामुळे कोणाला संधी मिळणार याची मोठी उत्सुकता आहे. केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला चार मंत्रीपदं मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिंदे गटाला दोन कॅबिनेट मंत्रिपद आणि दोन राज्यमंत्रिपदे मिळणार असून मुंबई, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना संधी मिळू शकते. धनुष्यबाण चिन्ह मिळाल्याने मुंबईत निवडणूक सोपी जावी आणि शिंदे गटाची मदत मिळाली म्हणून स्थायी समिती अध्यक्ष राहिलेले राहुल शेवाळे यांना मंत्रीपद दिले जाणार असल्याची चर्चा आहे. तर श्रीरंग बारणेंना मंत्रीपद देऊन पश्चिम महाराष्ट्र मजबूत करण्यावर शिंदे गटाचा भर असणार आहे. विदर्भातही प्रतापराव जाधव यांना मंत्रीपद दिले जाईल अशी मोठी शक्यता आहे.