खोक्यांवरून शिंदे गट आक्रमक; आदित्य ठाकरे, अजित पवार, सुप्रिया सुळेंना नोटीस पाठवणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत भाजपसोबत सत्तास्थापन केल्यानंतर विरोधकांकडून शिंदे गटावर ५० खोक्यांचा आरोप केला जात आहे. गेल्या काही दिवसापासून सातत्याने यावरून विरोधक टीका करताना आपण पाहिलं आहे. यानंतर आता शिंदे गट आक्रमक झाला असून जे कोणी नेते ५० खोक्यांचा आरोप करतील त्याची आरोप सिद्ध करावे अथवा त्यांच्यावर २५०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकला जाणार आहे असा इशारा शिंदे गटाचे नवनिवार्चित प्रवक्ते विजय शिवतारे यांनी दिला आहे.

विजय शिवतारे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिलीय. अब्दुल सत्तार जे काही बोलले त्याचे समर्थन आम्ही करतच नाही. पण तुम्ही जे त्यांना ५० खोक्यांवरून चिडवताय, त्रास देताय त्याची ती रिअक्शन होती असं शिवतारे म्हणाले. तुमचे आरोप खरे असतील तर ते सिद्ध करा. नाहीतर मानहानीच्या केसला सामोरं जा. 50 आमदार गुणीले 50 असे 2500 कोटींचा अब्रु नुकसानीचा दावा केला जाईल. याबाबत उद्याच त्यांना नोटीस दिली जाईल असेही शिवतारे यांनी म्हंटल.

दरम्यान, राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून विरोधकांकडून सातत्याने शिंदे गटावर गद्दार, खोके असा आरोप केला जात आहे. त्यामुळे सरकारच्या प्रतिमेवर त्याचा थेट परिणाम होत आहे. त्यामुळेच अखेर शिंदे गट आक्रमक झाला असून आरोप करणाऱ्यांवर मानहानीचा दावा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.