नाशिक शिक्षक मतदारसंघातुन शिंदे गटाच्या किशोर दराडे यांचा विजय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे (Kishor Darade) यांचा विजय झाला आहे. तब्बल 24 तासांपासून याठिकाणी मतमोजणी सुरू होती. पहिल्या पसंतीच्या विजयाचा कोटा पूर्ण झाल्यानंतर आज सकाळपासून दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू झाली. पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत शिंदे गटाचे किशोर दराडे आघाडीवर होते. अखेर किशोर दराडेंनी विजय मिळवत अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे आणि महाविकास आघाडीच्या संदिप गुळवे यांचा पराभव केला.

अत्यंत प्रतिष्ठेची आणि चुरशीच्या या निवडणुकीसाठी 21 उमेदवार रिंगणात आहे. महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे (Kishor Darade) तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेंद्र भावसार (Mahendra Bhavsar), महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे (Sandeep Gulve) आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांच्यात प्रामुख्याने चौरंगी लढत पार पडली.

नाशिक शिक्षक मतदारसंघात विजयासाठी 31576 चा कोटा निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे विजयासाठी किशोर दराडे यांना दुसऱ्या पसंतीची 5100 मतं आवश्यक होती. यात किशोर दराडे यांनी आघाडी घेत बाजी मारली. किशोर दराडे यांना 26 हजार 476 मते मिळाली. अपक्ष विवेक कोल्हे यांना 17 हजार 372 मते मिळाली. तर शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे यांना 16 हजार 280 मते मिळाली. त्यामुळे किशोर दराडे 9 हजार 204 मताधिक्याने विजयी झाले.

खरं तर नाशिक शिक्षक मतदारसंघाची ही निवडणूक अनेक अर्थांनी गाजली होती. पैशांच्या वाटपाच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे ही निवडणूक चर्चेच्या केंद्रस्थानी होती. तसेच, स्वतः मुख्यमंत्र्यांनी या निवडणुकीत लक्ष घातलं होतं. आता शिंदे गटाच्या किशोर दराडे यांनी विजय मिळवल्याने उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीची हा मोठा धक्का मानला जात आहे.