Shirur Lok Sabha 2024 : शिरूरमध्ये अमोल कोल्हेंना नव्या घड्याळाचे काटे टोचणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Shirur Lok Sabha 2024 : छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृती अंगाखांद्यावर घेऊन वाढलेल्या शिरूर मतदारसंघ तयार झाल्यापासून सलग तीन टर्म शिवसेनेच्या आढळराव पाटलांनी (Shivajirao Adhalrao Patil) शिरूरवर एकहाती कंट्रोल ठेवला. समोर राष्ट्रवादीकडून उमेदवार बदलत गेला मात्र रिझल्ट सेम! आढळराव पाटलांपुढे कुठलाच उमेदवार टिकला नाही. पण शरद पवारांनी 2019 मध्ये शिवसेनेतून अमोल कोल्हेंच्या रूपाने (Amol Kolhe) मावळा फोडून त्याला शिरूरमधून तिकीट देत गुगली टाकली. यावेळेस चौकराच्या प्रतिक्षेत असणाऱ्या आढळरावांचा मात्र त्रिफळा उडाला… आणि कोल्हे पहिल्यांदा लोकसभेवर गेले. मात्र अजितदादांनी ‘घड्याळ तेच वेळ नवी’ म्हणत पक्षातच दुसरी चूल मांडली. अनेक मातब्बर फुटले. मात्र कोल्हे साहेबांसोबत एकनिष्ठ राहिले. त्यामुळे एकेकाळी कोल्हेंना निवडून आणण्यासाठी मतदारसंघ पिंजून काढणाऱ्या दादांना आता मात्र उलटा डाव टाकावा लागणार आहे. महायुतीत असल्यामुळे अजितदादा आता कोल्हेंना धूळ चारण्यासाठी खेळ खेळणार एवढं पक्कं आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत कोल्हे विरुद्ध आढळराव असा सामना पुन्हा पाहायला मिळणार का? याकडे लक्ष्य लागलं आहे.

जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, भोसरी, शिरूर आणि हडपसर अशा सहा शहरी, निमशहरी विधानसभांनी बनलेला शिरूर मतदारसंघ. ( Shirur Lok Sabha 2024 ) शिवनेरी किल्ला, भीमा- कोरेगाव, देवाची आळंदी, रांजणगाव गणपती आणि औद्योगिक वसाहतींचं जाळ असणारा हा मतदारसंघ हा पहिल्यापासूनच शिवसेनेच्या वळचणीला बांधलेला! शिवसेनेच्या आढळराव पाटलांनी या मतदारसंघावर एकहाती वर्चस्व गाजवलंय. 2004, 2009 आणि 2014 साली सलग तीन टर्म दिल्लीवारी करणाऱ्या आढळराव पाटलांनी विरोधकांना चितपट करत मतदारसंघावरचा आपला दबदबा कायम ठेवला होता. राष्ट्रवादीने या मतदारसंघासाठी नेहमीच संघर्ष केला. विलास लांडे, देवदत्त निकम यांनी घड्याळाच्या काट्यावरून मातब्बर आढळरावांना आव्हान दिलं खरं मात्र त्यात त्यांना काही यश आलं नाही…

Amol Kolhe यांना Ajit Pawar यांचं आव्हान; आढळराव घाटात शर्यत रंगवणार

त्यामुळे 2019 च्या निवडणुकीत आढळराव आरामात विजयाचा चौकार मारणार असं वातावरण झालं असताना अचानक वाऱ्याचा झोत बदलला. आणि हे काम केलं शरद पवार यांनी! शिवसेनेत असणाऱ्या अमोल कोल्हेंना फोडून पवारांनी त्यांना डायरेक्ट शिरूरमधून आढळरावांच्या विरोधात उभं केलं. आणि त्यांनी शिवसेना-भाजपची भक्कम युती असताना आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आढळरावांचा मतदारसंघातील बेस मजबूत झालेला असतानाही 58,483 मतांनी कोल्हे आढळरावांना वरचढ ठरले. आणि तेव्हापासून कोल्हेंचा पॉलिटिकल ग्राफ चढता राहिला तर आढळराव मेन्सस्ट्रिम पॉलिटिक्सपासून साईडलाईन झाले. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेनं अमोल कोल्हे महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाले आणि याच प्रसिद्धीचा फायदा त्यांना शिरूरमध्ये झाला.

आढळराव अजितदादांच्या घड्याळावर लढणार? Shirur Lok Sabha 2024

अमोल कोल्हे लोकसभेतही वादळी चर्चांमध्ये भाग घेत आपल्या भाषणांनी आगळावेगळा ठसा उमटवत असतात. मतदारसंघातील अनेक प्रश्नांना घेऊन त्यांनी पटलावरून अनेकदा प्रश्नही उपस्थित केले आहेत. त्यामुळे शिरूर मधून इस्टॅब्लिश राजकारण करायला त्यांना काही प्रमाणात यश आलं होतं. त्यामुळे आगामी निवडणुकीतही कोल्हे आढळरावांना जड जाणार असं बोललं जात असताना अजितदादांच्या एका निर्णयाने मतदारसंघातील राजकारणच उलटं फिरलं. अजितदादांनी पक्षातच वेगळी चूल मांडत भाजप आणि शिंदे गटासोबत घरोबा केला. याच शिंदे गटात आढळराव पाटील देखील आहेत. मात्र अमोल कोल्हे यांनी मात्र घड्याळ तेच वेळ नवी या अजितदादांच्या मंत्राकडे कानाडोळा करत शरद पवारांसोबतच राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत अजितदादा शिरूर लोकसभेत महत्वाची भूमिका बजावताना दिसून येतील. याचाच परिणाम म्हणून की काय एकेकाळी अजितदादांचं नाव जरी काढलं तरी आगपाखड करणाऱ्या आढळराव पाटलांच्या तोंडी आता सबुरीचे बोल आहेत. अनेकदा तर जाहीरपणे त्यांनी अजितदादांच्या भूमिकांचं समर्थन करत त्यांनी शिरूर मतदारसंघावर दावा ठोकला तर गैर वाटणार नाही. असं बोलूनही दाखवलंय. थोडक्यात काय तर शिंदे गटात असणारे आढळराव पाटील सध्या अजितदादांच्या जवळ जाऊ पाहतायत. कदाचित घड्याळाच्या चिन्हावर ते कोल्हेंच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरू शकतात.

अजित पवारांकडे ही अमोल कोल्हेंची घोडेस्वारी रोखणारा दुसरा उमेदवार नाहीये. त्यामुळे त्यांच्याकडे दोन पर्याय असू शकतात. एकतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आढळरावांना ते स्वतःकडे खेचू शकतात किंवा सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू आमदार पैलवान महेश लांडगेंना स्वगृही परतण्याचं ते आमंत्रण धाडू शकतात. त्यामुळे अजितदादा नेमका कोणता कॉल देणार यावर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे बरच गणित अवलंबून असणार आहे. बाकी या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवारांची संख्या काही कमी नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडलेल्या घडामोडी महायुतीच्या पथ्यावर पडणाऱ्या असल्याचा दावा माजी खासदार आढळराव पाटील यांनी केलाय. तर भाजपच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. डॉ. अमोल कोल्हे यांच्या शिवस्वराज्य यात्रेमुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला बळ मिळालं होतं. मात्र आता अजित पवार आणि दिलीप वळसे-पाटील भाजप सोबत सत्तेत सहभागी झाल्यानं शरद पवारांसोबत असलेले खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासमोरील आव्हानं वाढली आहेत. त्यामुळे त्यांना आता शेतकरी आक्रोश मोर्चा काढत आता नव्यानं मतदारसंघात मोट बांधावी पाहत आहे.

शिवसेनेच्या बालेकिल्लात आधी राष्ट्रवादी काँग्रेसचा शिरकाव झाला होता. आता भाजपनंही शिरूर मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलंय. त्यामुळे अजित पवारांच्या मदतीनं (Shirur Lok Sabha 2024) शिरूरमध्ये कमळ फुलणार का? खासदारकीचा दीर्घकालीन अनुभव असणारे आढळराव विद्यमान खासदार कोल्हे यांना चितपट करून पुन्हा दिल्लीवारी करणार? की मतदारसंघातील आणि लोकसभेतील कामाच्या आधारावर मोठा जनसंपर्क मिळवत कोल्हेच सगळ्यांना पुरून उरणार? हे आगामी काळात समजेलच