मुंगूसाच्या तस्करीत दोघेजण अडकले पोलिसांच्या सापळ्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

घोरपड पकडण्यासाठी जाळी लावून बसलेल्या दोघांनी जाळीत सापडलेल्या चार मुंगसांना ठेचून मारल्याची घटना सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथे घडली आहे. याप्रकरणी खंडाळा वन विभागातील पोलिसांनी मुकेश व्यंकण्णा विनिकोंडा (वय 20) व संपत अर्जुन आलम (वय 41) या दोघांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आयुर्वेदिक औषधांच्या नावाखाली गावोगावी ओढ्यांच्या परिसरात जाऊन फासे लावून मुंगूस मारण्याचे काम संबधीतांकडून केले जात होते. त्यादरम्यान शिरवळ येथे मांड नदीच्या ओढ्या नजीक असणाऱ्या फुलमळा शिवारामध्ये विनीकोंडा याने घोरपड पकडण्यासाठी जाळे लावले होते. या जाळीमध्ये घोरपड अडकण्याऐवजी 4 मुंगसे अडकली. त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्याऐवजी या दोघांनी त्यांना ठेचून मारले. या मुंगसांची विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्नात असताना खंडाळा वन विभागाच्या पथकाने छापा मारून त्या दोघांना पकडले. त्यांच्याकडील मृत मुंगसे ताब्यात घेण्यात आली आहेत.

 

खंडाळ्याच्या वनक्षेत्रपाल प्रियंका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल राहुल जगताप, वनरक्षक वसंत गवारी, प्रकाश शिंदे यांनी ही कारवाई केली. मुंगूस हा प्राणी वन विभागाच्या परिशिष्ट एकमध्ये येतो. विनीकोंडा आणि आलम यांची वन विभागाच्या कार्यालयात कसून चौकशी करण्यात आली. तसेच त्यांच्याकडून पिशवीत भरलेले 4 मृत मुंगूस आणि मुंगूस मारण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.