Satara News : आफ्रिकेतील सर्वोच्च किलीमांजरो पर्वतावर शिवरायांचा जयघोष

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके
कोरेगाव येथील तरुण गिर्यारोहक समीर मालुसरे याने 19 फेब्रूवारी रोजी आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट किलीमांजारो (19, 341 फूट) सर केले असून या मोहिमेत त्याने शिवजयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती शिखरावर नेऊन भारतीय तिरंग्यासह भगवा ध्वज फडकवला. आपल्या पाच सहकाऱ्यासोबत समीरने तीन दिवसांची आगेकूच करत शिखरावरील चढाई सुरु केली. वातावरणाचा त्रास सुरु झाल्यानंतर पाच पैकी दोघे परत फिरले, मात्र अंतिम टप्प्यातील सलग नऊ तास अवघड चढाई (दि. १९) च्या मध्यरात्री सुरु करत किलीमांजारो शिखरावर सकाळी पोहोचून छत्रपती शिवरायांचा जयघोष करत समीरने आपल्या दोन सहकाऱ्यांसह ही मोहिम फत्ते केली.

एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेचे आयोजन केले होते. असंख्य अडथळे आणि अडचणी पार करत त्याने हे यश मिळवले. किलीमांजारो हे टांझानिया (आफ्रिका) देशातील शिखर असून याची उंची समुद्रसपाटी पासून 19, 341 फूट आहे. प्रचंड अवघड, सतत बदलते वातावरण, उणे 15 ते 20 तापमान आणि इतक्या उंचीवर असलेले हे शिखर सर करण्याचं धाडस दाखवल्याबद्दल समीरचे सर्वत्र कौतुक होत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून 360 एक्सप्लोरर मार्फत त्यानी सात महाद्वीपा मधील पहिले शिखर सर केले असुन पूढे बाकी महाद्वीपा मधील उर्वरीत सर्वात ऊंच सहा शिखरे सर करण्याचा त्याचा मानस आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, रनिंग, सायकलिंग, ट्रेकिंग आणि माऊटेनिरीग आदीमध्ये प्राविण्य मिळवल्यानंतर समीर मालुसरे याने सप्टेंबर 2019 मध्ये दार्जिलिंग येथील हिमालय माउंटनिरीग या इन्स्टिट्यूटमध्ये एक महिन्याच्या बेसिक गिर्यारोहकाचे प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर त्याने ऑक्टोबर 2019 मध्ये हिमालयातील माउंट रेनॉक हे पाच हजार मीटर उंच शिखर सर करून तेथे तिरंगा फडकवला होता. एप्रिल 2022 मध्ये अरुणाचल प्रदेशमधील नॅशनल इन्स्टिट्यूटमधून त्याने एक महिन्याचा कोर्स पूर्ण केला. माउंट एव्हरेस्ट पर्वत सर करण्याचे ध्येय मनाशी बाळगलेल्या समीर मालुसरे याची 360 एक्सप्लोरर या संस्थेमार्फत आंतरराष्ट्रीय गिर्यारोहणासाठी निवड झाली होती. त्यानुसार आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर माउंट किलीमांजारो हे शिखर सर करण्यासाठी समीर मालुसरे याने 14 फेब्रुवारी 2023 रोजी प्रारंभ केला आणि 19 फेब्रुवारी 2023 रोजी त्याने माउंट किलीमांजारो हे शिखर सर करत त्या ठिकाणी भारताचा तिरंगा आणि भगवा ध्वज अभिमानाने फडकवत, ही मोहिम त्याने छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केली.

या मोहिमेचा खर्च खुप मोठा होता, त्यासाठी समीरला कोरेगाव शहरातील व जिल्ह्यातील अनेक दानशूर व्यक्तीसह छत्रपती संभाजीनगरमधील रहिवासी, मित्रपरिवाराने मोठा सहयोग दिला. दक्षिण आफ्रिकेत जाऊन यशस्वी केलेल्या या मोहिमेत समीरला महाराष्ट्रातील तुषार सुभेदार, सागर कुंभारे, सुबोध वरघट आणि सागर बोडके यांची साथ लाभली. स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रात शिकलेल्या समीर मालुसरे याने कोरेगावच्या सरस्वती विद्यालयात माध्यमिक तर साताऱ्याच्या कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी व यशोदा शिक्षण संस्थेतून महाविद्यालयीन शिक्षण घेतले आहे. गिर्यारोहणाची आवड मी कायम जोपसणार असून यानंतर जगातील सातही खंडांतील सात सर्वोच्च पर्वतशिखरे सर करण्याचे त्यांचे ध्येय असल्याचेही त्याने सांगितले.