Tuesday, January 7, 2025

शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी!! महाराजांची वाघनखे साताऱ्यात प्रदर्शनासाठी खुली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारकरांसह संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे आता महाराष्ट्रात याची देही याची डोळा पाहता येणार आहे. साताऱ्यात वस्तू संग्रहालयात शिवरायांची ही वाघनखं प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. या प्रदर्शनाला ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ असं नाव ठेवण्यात आलं आहे. या शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याशिवाय लंडनहून वाघनखं घेऊन आलेल्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयाचे आंतरराष्ट्रीय कार्यक्रम प्रमुख निकोलास मर्चंड हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

छत्रपती शिवरायांच्या वाघनखांची लांबी 8.6 सेमी आणि वजन हे केवळ 49 ग्रॅम इतकं आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पडदा बाजूला सारताच संपूर्ण महाराष्ट्राला शिवरायांच्या वाघनखांची पहिली झलक पाहायला मिळाली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन झाल्यानंतर आता सर्वसामान्य शिवप्रेमींना सुद्धा हि वाघनखे याची देही याची डोळा पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे फक्त वाघनखंच नाहीत तर इतर शस्त्रास्त्रांचंदेखील प्रदर्शन शिवप्रेमींना पाहता येणार आहे. या प्रदर्शनाला ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ असं नाव ठेवण्यात आलं आहे.

सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत हि शिवकालीन वाघनखे नागरिकांना पाहण्यासाठी खुली राहतील . यासाठीची तिकिटे ऑनलाईन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने नागरिकांना उपलब्ध करून घेता येतील. एका वेळी दोनशे लोकांना हे प्रदर्शन पाहता येईल. दिवसभरातून यासाठी चार स्लॉट उपलब्ध करून देण्यात आले असून यामध्ये पहिला प्लॉट विद्यार्थ्यांसाठी मोफत राहणार आहे.