हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: विधानसभा निवडणुकीनंतर सध्या राज्यांमध्ये विधान परिषदेच्या (Legislative Council) निवडणुकीची चर्चा रंगली आहे या निवडणुकीमध्ये शिवसेनेला फक्त एकच जागा मिळाली आहे. त्यामुळे या जागेत शिवसेनेकडून कोणता उमेदवार उभा राहील? याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात होते. अखेर शिवसेनेने अधिकृत उमेदवार म्हणून चंद्रकांत रघुवंशी (Chandrakant Raghuvanshi) यांच्या नावाची घोषणा केली आहे. अनेक इच्छुक उमेदवारांमध्ये चुरस असतानाही अखेर रघुवंशी यांच्यावर विश्वास दाखवण्यात आला आहे.
शिंदे गटाच्या वाट्याला एक जागा
विधानपरिषदेसाठी होणाऱ्या या निवडणुकीत शिवसेनाकडे एक जागा होती. या जागेसाठी संपर्क प्रमुख शीतल म्हात्रे, संजय मोरे आणि किरण पांडव यांच्या नावांचीही चर्चा होती. मात्र, पक्षाने अखेर धुळे-नंदुरबारचे शिवसेना संपर्क प्रमुख आणि माजी विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांना संधी देण्याचा निर्णय घेतला. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला, असे बोलले जात आहे.
कशी रिक्त झाली विधानपरिषदेची जागा?
शिवसेना (शिंदे गट) चे आमश्या पाडवी हे अक्कलकुवा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकून आमदार झाले. त्यामुळे विधानपरिषदेत त्यांची जागा रिक्त झाली. सव्वातीन वर्षांचा कार्यकाळ बाकी असलेल्या या जागेसाठी आता निवडणूक होत आहे, आणि त्यात शिवसेना (शिंदे गट) कडून रघुवंशी यांना संधी देण्यात आली आहे.
चंद्रकांत रघुवंशी कोण?
चंद्रकांत रघुवंशी यांचे राजकीय करिअर काँग्रेस पक्षातून सुरू झाले. 1992 मध्ये ते जिल्हा परिषद सदस्य झाले आणि त्यानंतर धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून तब्बल सहा वर्षे काम पाहिले. पुढे ते तीन वेळा विधानपरिषद सदस्य राहिले. 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, जुलै 2022 मध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. आता त्यांना पुन्हा विधानपरिषदेत संधी मिळाली आहे.
इतर पक्षांकडून कोण उमेदवार?
या निवडणुकीत भाजपाने तीन उमेदवारांची नावे घोषित केली आहेत:
- संजय किणीकर – संभाजीनगर
- दादाराव केचे – वर्धा
- संदीप जोशी – नागपूर
राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर केलेले नाहीत, पण उमेश पाटील आणि झिशान सिद्दीकी यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, विधान परिषदेची निवडणूक ही सर्वच पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानली जात आहे. यासाठी भाजपाने आपल्या उमेदवारांची तयारी सुरू केली आहे, राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप निर्णय घेतलेला नाही. आता, शिवसेनेने आपल्या जागेसाठी चंद्रकांत रघुवंशी यांना अधिकृतरित्या मैदानात उतरविले आहे.