अर्जुन खोतकर शिंदे गटात सामील; ठाकरेंची साथ सोडताना डोळ्यात पाणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर यांनी अखेर शिंदे गटात प्रवेश केला आहे. आज पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनतर आपण हा निर्णय घेतला असं खोतकर म्हणाले.

मी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली, माझी जी परिस्थिती आहे ते सगळं त्यांच्या कानावर घातलं आहे. पक्षप्रमुखानी परवानगी दिल्यानंतर आज मी सर्वांच्या साक्षीने शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेत आहे. काही परिस्थितीमुळे मला हा निर्णय घ्यावा लागतोय अशी खंतही अर्जुन खोतकर यांनी यावेळी बोलून दाखवली . उद्धव ठाकरेंची साथ सोडताना अर्जुन खोतकर हे भावुक झाले.

जालन्यातील साखर कारखान्याविरोधात ईडीची जी कारवाई सुरु आहे, ती अडचण दूर होईल की नाही माहिती नाही. मात्र शेतकऱ्यांसाठी, हा कारखाना सुरु करण्यासाठी मदत करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी मला दिले आहे. त्यामुळे आज मी त्यांना माझं समर्थन जाहीर करतो असं म्हणत त्यांनी शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा दिला .

गेल्या ४० वर्षांपासून शिवसेनेत काम करत असताना पक्षाचे संघटन वाढवले. सामान्य माणसाने देखील आमच्यावर तेवढाच विश्वास आमच्यावर टाकला. स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत आमच्या पदरात लोकांनी यश टाकलं त्याबद्दल मी जालना जिल्ह्यातील सर्व मतदारांचे आभार व्यक्त करतो. तसेच पक्षनेतृत्वाचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो की, त्यांनी ही जबाबदारी माझ्यावर टाकली आणि ती जबाबदारी मी समर्थपणे सांभाळू शकलो असं अर्जुन खोतकर म्हणाले.