चंद्रकांत पाटलांना भिकेचे डोहाळे लागलेत; सामनातून घणाघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केल्यांनतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका झाली. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून पाटलांवर निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटलांना भिकेचे डोहाळे लागले आहेत व तेच त्यांच्या मुखातून बाहेर पडत आहे असं म्हणत शिवसेनेने त्यांचा समाचार घेतला आहे.

महाराष्ट्रात कटुतेचा स्फोट झाला आहे व या वातावरणास भारतीय जनता पक्षच जबाबदार आहे. महाराष्ट्रातले वातावरण इतके गढूळ आणि विषारी कधीच झाले नव्हते. महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी येथे शाईफेक करण्यात आली. अशा घटनांचे समर्थन करता येणार नाही, पण शेवटी जे पेरले तेच उगवताना दिसत आहे. पाटील यांनी डॉ. आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासंदर्भात एक विधान केले. त्यातून हा शाईफेकीचा स्फोट झाला असं शिवसेनेनं म्हंटल.

भाजपचे राज्यपाल व मंत्र्यांनी आधी छत्रपती शिवरायांचा अपमान केला. ते वातावरण तापलेले असतानाच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून भडका उडाला, ‘त्या काळात सरकार अनुदान देत नसतानाही डॉ. आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांनी लोकांकडे भीक मागून शाळा उभारल्या. आता मात्र संस्थाचालक शाळांच्या अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहतात,’ असे श्री पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या महापुरुषांनी भीक मागितली हे पाटलांचे विधान आता वादाचे कारण ठरले आहे. महाराष्ट्र सरकारचे मी त्यांच्या वाचाकीमुळे रोजच स्वतचे हसे करून घेत आहेत व महाराष्ट्राची बदनामी करत आहेत.

चंद्रकांत पाटील हे तर राज्याचे उच्च शिक्षणमंत्री आहेत. शिक्षणमंत्री म्हणून त्यांना भिकेचे डोहाळे लागले आहेत व तेच त्यांच्या मुखातून बाहेर पडत आहे. पाटील यांच्या विधानाचे पडसाद बहुजन समाजात उमटू लागले आहेत. ते पिंपरीतील घटनेवरून दिसले. महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, कर्मवीर पाटील यांनी ‘लोकवर्गणीतून संस्था उभ्या केल्या. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बाबत सांगायचे तर, बहुजन समाजाला इतरांच्या बरोबरीने स्थान मिळाले पाहिजे, जाती- जमातीचे भूत गाडले गेले पाहिजे या विचाराने त्यांनी सातारच्या माळरानावर ज्ञानयज्ञ उभा केला व जगभरात नेला.

कर्मवीरांनी पत्नीचे दागिने विकले, पण पैशाअभावी मुलांचे शिक्षण थांबू दिले नाही. जोतिराव, सावित्रीबाई आणि त्यांचे सहकारी पदरमोड करून शाळा चालवीत असत. बाबासाहेबांनी गरीबांच्या शिक्षणासाठी खूप खस्ता खाल्ल्या. बाबासाहेब हे तर स्वाभिमानाचा एक धगधगता ज्वालामुखीच होते, असे आचार्य अत्रे यांनी म्हटले आहे ते खरेच आहे. महाराष्ट्राच्या विद्यमान उच्च शिक्षणमंत्र्यांचा अभ्यास कच्चा असल्यानेच त्यांनी महापुरुषांनी शाळा चालविण्यासाठी भीक मागितली असे म्हटले. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आता दिलगिरी व्यक्त करून माघार घेतली. तरीही शाईफेकीचा हल्ला त्याच्यावर झाला. महाराष्ट्रात महापुरुषांच्या बदनामीचा ‘जिहादी सरकारने पुकारला आहे काय? ‘लव्ह जिहाद विरुद्ध कायदा महाराष्ट्र सरकार बनवत आहे. त्याआधी शिवराय, फुले, आंबेडकरांच्या विरोधात वळवळणाऱ्या जिभांना आवर घालणारा कायदा बनवा असं म्हणत सामनातून टीका करण्यात आली आहे.