हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सामनातील मुलाखतीला फिक्स मॅच म्हणल्यानंतर आज सामना अग्रलेखातून फडणवीसांवर घणाघात केला आहे. उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीने फडणवीसांना ठसका लागला, जळजळ झाली. त्याला कोणी काय करायचे? असा टोला शिवसेनेनं लगावला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे आहे की, ठाकरे यांची मुलाखत म्हणजे मॅच फिक्सिंग आहे.’ यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. जर त्यांनी ती वाचली नसेल म्हणजे ते राजकीय पुरुष नाहीत. कारण उद्धव ठाकरे हे काय बोलतात याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले होते. फडणवीस यांची मानसिक स्थिती समजून घेतली तर त्यांचे बोलणे गांभीर्याने घेण्याची गरज नाही. भाजपच्या हायकमांडने त्यांना जो धक्का दिला आहे, त्यातून ते अद्यापि सावरलेले नाहीत. मागची अडीच वर्षे ते मुख्यमंत्रीपदासाठी झगडले, पण त्यांना शेवटी त्यांच्यापेक्षा कनिष्ठ माणसाच्या हाताखाली काम करावे लागत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर ही वेदना एक महिन्यानंतरही स्पष्ट दिसत आहे. त्यांच्या पोटात जळजळ व मनात खदखद असल्याने उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीबाबत त्यांनी केलेल्या विधानांकडे वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहायला हवे असा चिमटा शिवसेनेनं लगावला.
उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील राजकीय वादळानंतर एक मुलाखत काय दिली, राज्यात जणू भूकंपाचे हादरेच बसले. ठाकरे यांच्या मुलाखतीवर क्रिया-प्रतिक्रिया सुरू झाल्या. समस्त शिवसेना विरोधक एकजुटीची वज्रमूठ आवळून बेताल वक्तव्ये करताना दिसत आहेत. एका मुलाखतीत इतकी ताकद असते हे यानिमित्ताने महाराष्ट्राला कळले. दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत खास पत्रकार परिषद घेऊन ‘ठाकरे – राऊत ‘ मुलाखतीवर खुलासे व हल्ले केले जात आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘ठाकरे’ नामाचे महत्त्व अधोरेखित करणारे हे दृश्य आहे. ठाकरे यांनी मुलाखतीत त्यांची भूमिका व बाजू मांडली. घरातल्याच लोकांनी आपल्याबाबतीत कशी दगाबाजी केली याबद्दल मन मोकळे केले. इस्पितळातील अतिदक्षता विभागात झुंज सुरू असताना बाहेर सरकार उलथवून टाकण्यासाठी कसे ‘अघोरी’ प्रकार सुरू होते, त्यावर ठाकरे बोलले व तेच खरे फडणवीसांच्या संतापाचे कारण आहे. ‘ठाकरे राऊत’ मॅच फिक्सिंग होती तर मग ठाकरे इस्पितळात असताना बाहेर सरकार पाडण्याच्या निर्घृण हालचाली सुरू होत्या, त्या फिक्सिंगला कोणते नाव द्यायचे? असा सवाल सामनातून करण्यात आला.
फडणवीस व त्यांच्या सरकारला नैतिकतेचे कितीही प्रवचन झोडू द्या, खरे काय ते लोकांना माहीत आहे. ‘ठाकरे – राऊत’ मुलाखतीचा भूकंप म्हणजे मॅच फिक्सिंग असा आरोप करणारे श्री. फडणवीस हे काही ‘श्रीमान सत्यवादी’ नाहीत. आम्ही फडणवीसांच्या वक्तव्याची दखल घेतली. कारण ज्यांच्यावर किमान बोलावे व लिहावे असे ते व्यक्तिमत्त्व आहे. बाकी सगळे पादरे पावटेच आहेत. श्री. फडणवीस म्हणतात, ठाकऱ्यांची मुलाखत वाचनीय नाही. याचा सरळ अर्थ असा की, अस्सल मराठमोळा ठेचा असलेल्या या मुलाखतीने त्यांना ठसका लागला, जळजळ झाली. त्याला कोणी काय करायचे? असा टोला शिवसेनेनं लगावला.